Hinjawadi News : हिंजवडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस; नागरिकांवरील हल्ल्यांचे प्रकार वाढले

मागील आठवड्यात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील मेगापोलीस सोसायटी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी हैदोस मांडला आहे. या कुत्र्यांनी अनेक नागरिकांच्या अंगावर धावून त्यांच्या शरीराचे लचके तोडल्याचे प्रकार घडले आहेत. मागील आठवड्यात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

गीतिका बिष्ट (वय 28, रा. सांगरिया सोसायटी, मेगापोलीस, फेज तीन, हिंजवडी) असे गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.

गीतिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 25) रात्री आठ वाजताच्या सुमारास सोसायटीच्या बाहेर फिरण्यासाठी गेले. तिथे एका इमारतीचे काम सुरू आहे. त्या जागेत काही मोकाट, पिसाळलेले कुत्रे आहेत. अचानक 5 ते 6 कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला. कुत्र्यांनी ठिकठिकाणी त्यांचे लचके तोडले.

जोरजोरात ओरडल्यामुळे दूरवरून जात असलेल्या हिमेश आणि कविता या दाम्पत्याने कुत्र्यांच्या हल्ल्यातून गीतिका यांना वाचवले. त्यांनी पवन चोबे यांच्या मदतीने गीतिका यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कुत्र्यांकडून होणारे हल्ले हा प्रकार लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक आहे.

पवन चोबे म्हणाले, “गीतिका यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. एखाद्या सामाजिक संस्थेशी संपर्क करून मोकाट कुत्र्यांना पकडण्यात येईल, असे आश्वासन ग्रामपंचायतकडून दिले आहे. मात्र अद्याप कुत्र्यांना पकडण्यात आले नाही.”

मागील दोन महिन्यांपूर्वी आणखी एका तरुणीसोबत असा प्रकार घडला होता. निधी पाल (वय 25, रा. सांगरिया सोसायटी, मेगापोलीस, हिंजवडी) असे त्यांचे नाव आहे.

निधी यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, “सोसायटीच्या पार्किंगमध्ये चालत जात असताना अचानक 7 ते 8 कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला. पायावर ठिकठिकाणी चावा घेतला. सोसायटीचे सुरक्षा रक्षक वेळीच मदतीला आले आणि त्यांनी कुत्र्यांना हकलवून दिले. याबाबत सोसायटीकडे तक्रार केली आहे.”

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांसाठी हे प्रकार धोक्याचे आहेत. स्थानिक प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.