Hinjawadi : कारचालकाला अडवून मारहाण करत लुटले!

एमपीसी न्यूज – कारमधून जात असताना चार जणांनी मिळून कार अडवून चालकाला मारहाण करून लुटले. हा प्रकार रविवारी (दि. 2) पहाटे साडेबाराच्या सुमारास हिंजवडी फेज एक येथे घडला. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अक्षय राजेंद्र देशमुख (वय 22, रा. पिरंगुट लवळे फाट्याजवळ, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश नारायण वाघ (वय 27, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कारमधून (एम एच 16 / बी एच 7408) त्यांच्या कामगारासोबत घरी जात होते. कट मारल्याचा बहाणा करून आरोपींनी देशमुख यांची कार थांबवली. आरोपींनी देशमुख यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

फिर्यादी त्यांच्या कामगारासोबत घटनास्थळावरून पळून गेले असता आरोपींनी त्यांच्या कारच्या काचा फोडून कारमधून बॅटरी चोरून नेली. पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.