Hinjawadi : गोळीबार झालेल्या तरुणावर शस्त्रक्रिया; जबड्यात अडकलेली गोळी काढली, प्रकृती स्थिर

अनिकेत याच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली : Surgery on a young man who was shot; The bullet stuck in the jaw was removed, the condition stabilized

एमपीसी न्यूज – सापडलेले पिस्टल हाताळत असताना तरुणाकडून चुकून स्वतःवरच गोळी झाडली गेली. यात तरुणाच्या जबड्यात गोळी रुतली. ही घटना सोमवारी (दि. 3) पहाटे बाणेर येथे घडली. जखमी तरुणावर हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून मंगळवारी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून जबड्यात अडकलेली गोळी काढण्यात आली आहे.

अनिकेत राजेंद्र मोरे (वय 28, रा. मोहननगर, बाणेर, पुणे. मुळ रा. किरणनगर नं 2, अमरावती) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत याच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया काही तास चालली. अनिकेतच्या जबड्यात, दाढेच्यावर गोळी अडकली होती. डॉक्टरांना गोळी काढण्यात यश आले आहे. सध्या अनिकेतची प्रकृती स्थिर आहे.

अनिकेतकडे असलेले पिस्तुल त्याला सापडले की त्याने कुणाकडून खरेदी केले. तसेच स्वतःवर गोळीबार करण्याचे नेमके कारण, याबाबत अद्याप काहीही उलगडा झालेला नाही. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे तपास करीत आहेत.

काय आहे प्रकरण ?

अनिकेत याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. लग्न झाल्यानंतर तो बाणेर येथे राहण्यास आला. लॉकडाऊन होण्यापूर्वी तो खासगी क्लासेस घेत असे. त्यावर अनिकेतच्या कुटुंबाची गुजराण सुरु होती.

लॉकडाऊनमुळे त्याचा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर त्याने मास्क आणि हॅंडग्लोज विकण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यातून त्याला काहीही फायदा होत नव्हता. त्यामुळे तो मानसिक तणावात होता.

दरम्यानच्या कालावधीत तो एका डोंगरावर फिरताना त्याला एक पिस्तुल सापडले. ते त्याने त्याच्या मोपेड दुचाकीच्या (एमएच 30 / एजे 1076) डिक्कीत ठेवले. व्यवसायाचे टेन्शन आल्याने रविवारी (दि. 2) तो दिवसभर दारू पित होता.

सोमवारी (दि. 3) पहाटे दोन वाजताच्या सुमारास तो सिगारेट ओढण्यासाठी घराबाहेर आला. त्याने गाडीच्या डिक्कीतून पिस्टल काढले. ते हाताळत असताना त्याच्याकडून अचानक गोळीबार झाला. पिस्टलमधून झाडली गेलेली गोळी अनिकेतच्या डाव्या जबड्यात रुतून बसली.

त्यानंतर अनिकेतला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी याबाबत सुरुवातीला चतुश्रुंगी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर ही माहिती हिंजवडी पोलिसांना देण्यात आली.

हिंजवडी पोलिसांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत दुचाकी, पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 45 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी अनिकेतच्या विरोधात भारतीय दंड सहिता कलम 338, भारताचा हत्यार अधिनियम कलम 3, 25 व मुबंई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.