Hinjawadi : विमा पॉलिसीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – विमा पॉलिसीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून अडीच लाख घेऊन विमा एजंट पती-पत्नी पसार झाले. हा प्रकार हिंजवडी येथे सप्टेंबर 2014 रोजी घडला. याप्रकरणी सोमवारी (दि. 8) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मनोहर बाबुराव वाघमारे (वय 57, रा. शिवाजी चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जयवंत जगन्नाथ सावंत (वय 41), श्रद्धा जयवंत सावंत (वय 34, रा. अभिनव कॉलेज जवळ, आंबेगाव बुद्रुक) या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती-पत्नी हे 16 सप्टेंबर 2014 रोजी फिर्यादी मनोहर यांच्या घरी आले. त्यांना जीवन समृद्ध विमा पॉलिसीची माहिती सांगितली. तसेच अडीच लाख गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनंतर दुप्पट पैसे आणि एक दुचाकी मिळणार असल्याचे आमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मनोहर यांनी आरोपींना कोरा धनादेश (चेक) सही करून दिला.

त्यानंतर आरोपींनी हिंजवडी येथील कॅनरा बँकेतून अडीच लाखांची रक्कम काढून घेतली. त्या रकमेची कोणत्याही स्वरूपाची पॉलिसी न काढता फसवणूक केली. याबाबत पाच वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.