Hinjawadi : नोकरीचे आमिष दाखवून तरुणांकडून फुकट काम करून घेत तोतया कंपनी चालक गायब

कंपनी चालकाविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी आठ तरुणांकडून पैसे घेतले. ते मुलाखतीमध्ये पास झाल्याचे सांगत नोकरीपूर्वी इंटर्नशिप करावी लागेल. मुलांकडून तीन महिने घरूनच इंटर्नशिपचे काम करून घेतले. त्यानंतर तोतया कंपनी चालक गायब झाला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मायक्रो इन्फोटेक कंपनी बाणेर येथे घडली.

हर्षद सुभाष शेळके (वय 25, रा. त्रिमूर्ती चौक, कात्रज. मूळ रा. दुधोटी, ता. पलूस, जि. सांगली) या तरुणाने याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रियम (पूर्ण नाव माहिती नाही. रा. सेक्टर 62, नोएडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद आणि त्यांच्या काही मित्रांनी मिळून नोकरीसाठी आरोपीच्या कंपनीत अर्ज केला. आरोपीने त्यांच्याकडून मुलाखतीसाठी प्रत्येकी 20 ते 22 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपीने मुलांना मुलाखतीत पास झाल्याचे सांगत इंटर्नशिप करावी लागणार असल्याचे सांगितले. मुलांकडून तीन महिने इंटर्नशिपच्या नावाखाली घरून काम करून घेतले. तीन महिन्यानंतर आरोपी गायब झाला. हर्षद याने आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हर्षदने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद कुरकुटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.