Hinjawadi : भूमकर चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल

पुढील दहा दिवसात नागरिकांना सूचना व हरकती देण्याचे पोलिसांकडून आवाहन

एमपीसी न्यूज – भूमकर चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. हिंजवडी वाहतूक विभागात वाहतूक कोंडीच्या बाबतीत हिंजवडी मधील शिवाजी चौकानंतर भूमकर चौकाचा नंबर लागतो. पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून हिंजवडीला वाहतूक कोंडीमधून मुक्त करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शिवाजी चौकातील वाहतूक बदलानंतर पोलीस आयुक्तालयाकडून भूमकर चौकामधील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल देखील तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. येत्या दहा दिवसात नागरिकांना याबाबत सूचना आणि हरकती पोलीस आयुक्तालयाकडे जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सोमवार (दि. 17) ते बुधवार (दि. 26) दरम्यान हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहेत. नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर येथे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. नागरिकांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

भूमकर चौकातील वाहतुकीतील बदल –

# हिंजवडी गावातून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांनी सरळ जाऊन काळा खडक येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

# डांगे चौकाकडून येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यू-टर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

# शनी मंदिर येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

# सयाजी हॉटेल येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.