Hinjawadi : ‘पीएमपीएमएल’च्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या पीएमपीएमएल बसने समोरच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील तरुणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री साडेअकरा वाजता मुंबई-बेंगलोर महामार्गावर पाषाण तलावासमोर बावधन येथे घडली.

मृदुल तरुण सिंघल (वय 25, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील तरुण विद्याभूषण सिंघल (वय 62) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पीएमपीएमएल बसवरील चालक उल्हास रामचंद्र सरफाले (वय 46, रा. सोंडे हिरोंजी, ता. वेल्हे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी उल्हास पीएमपीएमएलची एम एच 14 / सी डब्ल्यू 1769 ही बस घेऊन हिंजवडीकडून पुण्याकडे जात होता. बस भरधाव वेगात चालवत असताना बसची समोर जात असलेल्या फिर्यादी यांच्या मुलाच्या दुचाकीला मागून धडक बसली. यामध्ये मृदुल गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.