Hinjawadi : मुंबई-पुणे मार्गावरून ‘शिवनेरी बस’ प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप पळवला

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे या मार्गावर शिवनेरी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते नऊ या कालावधीत घडली.

अमित अरुण दामले (वय 41, मेंटल हस्पिटल रोड, नवपाडा, ठाणे पश्चिम) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दामले घोडबंदर रोड मुंबई येथे एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर काम करतात. त्यांना ऑफिसकडून लॅपटॉप दिला आहे. ते सोमवारी ऑफिसच्या कामानिमित्त मुंबईहुन पुण्याला येत होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते ठाणे ते स्वारगेट या शिवनेरी बसमध्ये ठाणे बस स्थानकावरून बसले. रात्री नऊ वाजता ते बालेवाडी स्टॉपवर उतरले.

बसस्टॉपवरून हॉटेलवर जात असताना त्यांना त्यांची बॅग हलकी वाटली. त्यामुळे त्यांनी बॅग तपासली असता त्यांच्या बॅगमध्ये त्यांचा लॅपटॉप नव्हता. त्यांनी त्यांच्या कंपनीत आणि घरी लॅपटॉप राहिल्याची खात्री केली मात्र, लॅपटॉप तिकडेही नसल्याचे समजले. याबाबत त्यांनी बस प्रवासात 30 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीला गेल्याची अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.