Hinjawadi : राष्ट्रीय स्केटिंगपटूच्या खूनप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्केटिंगपटूचा बिअरच्या बाटलीने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 4) सकाळी नऊच्या सुमारास मांरुजीतील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश शिवाजी नाईक (वय 24, रा. विघ्नहर्ता सोसायटी, सुसगाव, मूळ रा. शाहूनगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ, कोल्हापूर) असे खून झालेल्या स्केटिंगपटूचे नाव आहे.

याप्रकरणी कपिल भूपाल नाईक (वय 34, रा. सूसगाव. मूळ रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक मुळचे कोल्हापूरचे असून ते मागील पाच ते सहा वर्षांपासून आई आणि मोठ्या भावासोबत सुसगाव येथे राहत आहेत. ते गोखले नगर येथे स्केटींग प्रशिक्षकाचे काम करीत होते. नाईक हे इनलाईन हॉकी खेळत होते. त्यांनी राज्यस्तरावर दोन रौप्य तर, एक ब्राँझपदक पटकाविले आहे. तसेच त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड देखील झाली होती.

मंगळवारी निगडी येथील कॅम्प संपवून ते घरी आले. त्यानंतर ते मित्रांबरोबर घराबाहेर गेले होते. मंगळवारी रात्री सव्वानऊ ते बुधवारी सकाळी नऊ या कालावधीत मारुंजी येथील कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात त्यांची अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन हत्या केली. दारु पिताना झालेल्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.