Hinjawadi : बीडीएसला प्रवेश मिळवून देण्याचा बहाण्याने विदेशी तरुणाला पाच लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – मेडिकलच्या बीडीएस शाखेला प्रवेश मिळवून देण्याचा बहाण्याने तरुणाची पाच लाखांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2017 रोजी हिंजवडी येथे घडला.

महेरी अब्दुल हैदरी (वय 26, रा. पाषाण रोड, पुणे. मूळ रा. बंद्राअब्बास, इराण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार वकार मुक्तार आलम, मोहमद सादिक हुसेन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरी हे भारतात शिक्षण घेण्यासाठी आले आहेत. त्यांना मेडिकलच्या बीडीएस या शाखेत प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी आरोपींनी हैदरी यांना बीडीएस ला प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. त्यानंतर हैदरी यांची बनावट कागदपत्रे तयार केली. मात्र त्यांना बीडीएस ला प्रवेश मिळवून दिला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हैदरी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावर चौकशी करून पोलिसांनी सोमवारी (दि. 29) वकार आणि मोहमद यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक योगेश रामेकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.