Hinjewadi : दोन घटनांमध्ये पार्क केलेल्या कारमधून सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – हिंजवडी येथील हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या कारमधून किमती साहित्य चोरून नेले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण 2 लाख 27 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. दोन्ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री पावणेनऊ ते पावणेअकरा या कालावधीत घडल्या.

पहिल्या घटनेत अमित अनंत जैन (वय 40, रा. मानकर चौक, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित त्यांच्या कंपनीतील मित्रांसोबत इनोव्हा कारमधून हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. अमित आणि त्यांच्या दोन मित्रांचे लॅपटॉप कारमध्ये होते. त्यांनी हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार लॉक करून सर्वजण जेवण करण्यासाठी गेले. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून 60 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत वनिता उद्धव गायकवाड (वय 26, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनिता यांनी शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हिंजवडीमधील हॉटेल केजीएन येथे जेवणासाठी गेल्या. हॉटेलसमोर कार पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी कारमधून प्रत्येकी 80 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप, एक कॉस्मेटिक बॅग आणि हेडफोन असा एकूण 1 लाख 67 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.