Hinjawadi : हिंजवडीत वाहनांच्या रांगा; वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी

पावसामुळे दुचाकीऐवजी चारचाकी रस्त्यावर

एमपीसी न्यूज – हिंजवडीच्या वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले. आज (बुधवारी) सकाळी झालेल्या पावसामुळे हिंजवडी आयटीयन्सनी दुचाकीऐवजी चारचाकी वाहने घेऊन ऑफिस गाठले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाली आणि ट्राफिक जाम झाले. विप्रो सर्कल तीनपासून शिवाजी चौकाकडे सुमारे एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच वाहन चालक लेन कटिंग, वेगमर्यादा आणि अन्य वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने देखील वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

आज हिंजवडी आणि परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. तसेच सकाळपासून वातावरण ढगाळ असल्याने पाऊस येण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे हिंजवडी आय टी पार्कमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकीऐवजी चारचाकी कार घेऊन ऑफिस गाठले. सायंकाळी ऑफिस सुटल्यावर घरी जाण्याची सर्वांची एकच घाई झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने धावू लागली. दुचाकीपेक्षा चारचाकी वाहनांना जास्त जागा लागत असल्याने वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. हिंजवडी वाहतूक विभाग वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

चक्राकार एकेरी वाहतूक केल्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाली होती. वाहने एका जागेवर न थांबता धावती राहत होती, त्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना कमी वेळ लागत होता. वाहतुकीत बदल केल्यानंतर पावसाने उसंत घेतली होती, त्यामुळे आयटीयन्स दुचाकीला पसंती देत होते. त्यामुळे देखील वाहतुकीला गती मिळाली होती. परंतु आजच्या पावसामुळे वाहतूक कोंडीने पुन्हा डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले.

वाहन चालक वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळत नाहीत. त्यामुळे ब-याच वेळेला वाहतूक व्यवस्था बिघडते. नो एन्ट्री, नो पार्किंग, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे यांसारख्या नियमभंगांमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. पण त्यांना नागरिकांनी सुद्धा तेवढेच सहकार्य करणे गरजेचे आहे. तरच हा प्रश्न मिटू शकणार आहे, असे मत काही सुज्ञ नागरिकांमधूनच येत आहे.

हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे म्हणाले, “आज गणपती विसर्जन आहे. बहुतांश मंडळांनी मिरवणूका काढल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक विभागाकडून वाहनांना तात्काळ पर्यायी मार्ग किंवा वाहतुकीचे नियोजन करून रस्ता करून देण्यात येत आहे. पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. मिरवणुकीचा परिसर वगळता सर्व मार्गांवर वाहतूक सुरळीत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.