Hinjwadi : प्रत्येक भारतीयात उद्यमशीलता, नेतृत्वाचे गुण -डॉ. राधाकृष्णन पिल्लई

‘होप फाउंडेशन’तर्फे ‘श्री प्रल्हाद छाब्रिया स्मृती पारितोषिक’ जाहीर

एमपीसी न्यूज – “प्रत्येक मूल जन्माला येताना उद्यमशीलता आणि नेतृत्व हे गुण घेऊन येते. भारतीय तरुणांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गरज आहे ती, त्यांच्यातील या गुणांना चालना देऊन उद्यमशील आणि नेतृत्वक्षम बनविण्याची. त्यामुळे तरुणांनीही आपल्यातील क्षमता ओळखून उद्यमशीलतेला प्राधान्य देत व्यवसाय उभारावा,” असे मत चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठातील (लीडरशीप सायन्स) उपसंचालक डॉ. राधाकृष्णन पिल्लई यांनी व्यक्त केले.

फिनोलेक्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात डॉ. पिल्लई बोलत होते.

  • हिंजवडी येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (आयस्क्वेअरआयटी) मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (अ‍ॅनॅलिटिक्स अ‍ॅन्ड इन्साईट्स) उपाध्यक्ष आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्सच्या (आयईईई) पुणे शाखेचे अध्यक्ष दीनानाथ खोळकर, वुमेन इन इंजिनीअरिंग अ‍ॅफिनिटी ग्रुपच्या डॉ. राजश्री जैन, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्यवस्थापकीय विश्वस्त अमृता कटारा, डॉ. समिता मूलानी-कटारा, ‘आयस्क्वेअरआयटी’च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील आदी उपस्थित होत्या.

यावेळी प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्‍या ‘श्री प्रल्हाद पी. छाब्रिया स्मृती पारितोषिकां’ची घोषणा करण्यात आली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) जोधपूर येथील युवा संशोधक आणि सहायक प्राध्यापक डॉ. राजलक्ष्मी चौहान यांना प्राध्यापक गटातून, तर दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून बीटेकच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या शुभी सरीन हिला विद्यार्थिनींमधून यंदाचे ’प्रल्हाद पी. छाब्रिया पारितोषिक’ जाहीर झाले आहे. सव्वा लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

  • होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, वुमेन इन इंजिनीअरिंग अ‍ॅफिनिटी ग्रुप आणि आयईईई यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या भारतीय महिलेला हे पारितोषिक देण्यात येते. ’आयईईई महिला राष्ट्रीय अभियांत्रिकी परिषद 2019’मध्ये हे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करून त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रल्हाद छाब्रिया नेहमी पुढाकार घेत असत. महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असल्याचा त्यांना विश्वास होता. त्यांना जी संधी मिळेल, त्याचे सोने करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे ते नेहमी म्हणत असत. महिला आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी करीत नाहीत, तर समाज आणि देशाच्या उभारणीत योगदान देतात, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण नेहमी दिली, अशा शब्दांत अरुणा कटारा यांनी आपले वडील श्री प्रल्हाद पी. छाब्रिया यांच्या आठवणींना उजाळा दिला.

  • दीनानाथ खोळकर म्हणाले, “मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तिला जिज्ञासू बनवून त्यांच्यातील क्षमतांना वाव दिला पाहिजे. कृषी, पशुसंवर्धन यांसारख्या क्षेत्रातील सामान्यांसाठी तंत्रकुशल तरुणांनी उपाययोजना शोधण्यावर भर दिला पाहिजे. ग्रामीण भागाशी नाते समृद्ध करणे हीच भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. त्यामुळे ज्या समाजाने आपल्याला दिले त्या समाजाला परत देण्याची आपली भावना असावी.” डॉ. वैशाली पाटील यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.