Hinjwadi News: पत्रकारांसह कुटुंबियांना जिल्हा परिषदेच्या ‘विप्रो’ कोविड रुग्णालयात उपचाराची सुविधा

एमपीसी न्यूज – पत्रकार, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास पुणे जिल्हा परिषदेने उपचाराची सुविधा उपलब्ध केली आहे. जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील ‘विप्रो’ कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध ठेवले आहेत. पत्रकार, कुटुंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास ‘विप्रो’ रुग्णालयात दाखल व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. वार्तांकन करत असताना पत्रकारांना, त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर उपचार होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोई सुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्यात. यासाठी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय (विप्रो) हिंजवडी फेज दोन येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

पत्रकार, कुटुंबियांना जर कोरोना संसर्गजन्य आजाराची (ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, अशक्तपणा येणे, चव जाणे, सुगंध न येणे) इत्यादी लक्षणे आढळून आल्यास चाचणी करावी. चाचणीमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित जिल्हा परिषदेच्या हिंजवडीतील कोविड रुग्णालयाच्या चोवीस तास चालू असलेल्या 8956704750 या फोन नंबरवर संपर्क साधावा. जेणेकरून वेळेत कोरोना संसर्गजन्य आजारावर उपचार घेऊन लवकरात लवकर मात करता येईल.

या सुविधेसाठी काही मदत आवश्यक असल्यास माझ्या कार्यालयाच्या 020-26134313 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा स्वीय सहाय्यक किशोर कुलकर्णी यांच्याशी 9689131370 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.