Hinjwadi: ‘विप्रो’ने उभारलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्घाटन

The Chief Minister online inaugurated the Kovid Hospital set up by Wipro

एमपीसी न्यूज – कोरोनासारखे संकट अनेक वर्षानंतर आले आहे. देशातील पब्लिक प्रायव्हेट प्रोजेक्ट तत्वावर उभारण्यात आलेल्या हिंजवडीतील विप्रोने उभारलेल्या या पहिल्यावहिल्या कोविड रुग्णालयाचे आज लोकार्पण होतेय. केवळ पुण्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

विप्रोने 504 बेड्सचे अद्ययावत कोविड केअर हॉस्पिटल हिंजवडीत उभारले आहे. त्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. याठिकाणी 18 व्हेंटीलेटर्स, आयसीयू सुविधा आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.

दोन सुविधायुक्त रुग्णवाहिका सुद्धा विप्रो देत आहे. हे आता समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विप्रोने यासाठी आपली 1.8 लाख स्क्वेअर फुट एवढी आपली आयटीची इमारत दिली आहे. 5 मे ला सामंजस्य करार करून अवघ्या महिना सव्वा महिन्यात त्यांनी ती जागा आम्हाला दिली आहे.

विप्रो सामाजिक कार्यात सुद्धा किती वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने काम करते याचे ही रुग्णालय इमारत प्रतीक आहे. मी यासाठी रिशद प्रेमजी यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राने कोरोनाची लढाई सुरु केली. त्यावेळी आरोग्य सुविधा पुरेशा नव्हत्या. आज महाराष्ट्रात कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण झाल्या आहेत.

सुरुवातीला आमच्याकडे केवळ 2 प्रयोगशाळा होत्या. आता 80 ते 85 प्रयोगशाळा झाल्या असून लवकरच त्या 100 पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सुरुवातीला आमच्यासमोर पीपीई किट्स, एन 95 मास्क, व्हेंटीलेटर्स कुठून आणायचे हा प्रश्न होता. आता हे साहित्यही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आज 2 लाख 30 हजार पीपीई, 4 लाख 20 हजार एन 95 मास्क आपल्याकडे आहेत.

पूर्वी 3 आयसोलेशन केंद्रे होती आणि केवळ 350 बेड्स होते. आज आमच्याकडे 1484 कोविड सेन्टर्स, 2.5 लाख बेड्सची सुविधा आहे. मोठ्या शहरांमध्ये आम्ही जम्बो सुविधा निर्माण करीत आहोत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

आपण चीनचे उदाहरण देतो पण आम्ही इथे मुंबईत बीकेसी येथे अवघ्या 15 दिवसांत देशातले पहिले फिल्ड हॉस्पिटल उभारले आणि 1000 बेड्सची सोय केली.

त्याच्या बाजूलाच दुसरे उभारले जात आहे. गोरेगावला नेसको येथे जम्बो सेंटर सुरु झाले आहे.

नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड सेंटरही सुरु होत आहे. केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही. तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार आहे. तो देखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत.

विप्रो सारख्या नामवंत जागतिक कंपनीने स्वत:हुन पुढे येत अशी अद्ययावत सुविधा निर्माण करण्याची तयारी दर्शविली आणि विप्रो हे नाव त्यात असल्याने आम्हीही लगेच त्याला मान्यता दिली. आम्ही लॉकडाऊन उघडायला सुरुवात केली आहे.

त्यामुळे आमच्यासमोर आव्हानही आहे. पण ते सर्वांच्या मदतीने निश्चितपणे आम्ही पेलू, असा मला विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

या अतिशय अद्ययावत रुग्णालयाबद्धल मी रिशभ प्रेमजी यांचे मनापासून आभार मानतो. या रुग्णालयाचा उपयोग करण्याची वेळ कुणावरही न येवो. आणि ती आल्यास आनंदाने आणि ठणठणीतपणे बरे होऊन तो रुग्ण बाहेर पडो हीच सदिच्छा, असेही मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.