Hinjwadi: महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल ठेवणा-या ऑफिस बॉयवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – कंपनीतील महिलांच्या स्वच्छतागृहात गुपचूप मोबाईल ठेवून महिलांचे व्हिडिओ चित्रित करणा-या ऑफिस बॉय विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14)हिंजवडी येथे सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. 

विकास अंकुशराव घाडगे असे गुन्हा दाखल केलेल्या ऑफीस बॉयचे नाव असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंपनीतील एका 47 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारणे येथे सॉफ्टवेअर कंपनीचे ऑफीस आहे. या ऑफीसमध्ये विकास ऑफीस बॉय म्हणून नोकरी करत होता. त्याच्याकडे महिलांच्या स्वच्छता करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
स्वच्छता करण्यासाठी जेव्हा विकास या वॉशरूममध्ये जायचा तेव्हा तो तिथल्या पीओपी टाईल्समध्ये मोबाईल व्हिडिओ मोडमध्ये ऑन करून ठेवून द्यायचा.

एक दिवस त्याला मोबाईल घेऊन जाताना एका महिला कर्मचा-याने पाहिले. तिला संशय आला त्यामुळे, विकास बाहेर येताच तिने वॉशरूममध्ये जाऊन पहाणी केली. त्यावेळी  छताच्या बाजूला एक काळ्या रंगाचा मोबाईल  त्या महिलेला आढळून आला. त्यानंतर त्या महिलेने विकास याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.