Maval Crime News : दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दोन खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याची त्याच्या समर्थकांनी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे मारणे याच्या समर्थकांनी फटाके वाजवून, बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण तयार केले. याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात कुख्यात गुंड गजानन मारणे याची निर्दोष मुक्तता झाली आहे. सोमवारी (दि. 15) सायंकाळी त्याला नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी तळोजा कारागृहाच्या बाहेर तोबा गर्दी केली. तळोजा कारागृहापासून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यापर्यंत शेकडो गाड्यांच्या ताफ्यात त्याची जणू मिरवणूक काढण्यात आली.

जेलमधून सुटून आल्याने मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या इराद्याने बेकायदेशीर जमाव जमवला. तिथे फटाके वाजवून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. या संपूर्ण प्रकाराचे ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.

याबाबत गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 143, 283, मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1) सह 135 फौजदारी कायदा 213चे कलम 7 प्रमाणे शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

गजानन मारणे याला सन 2014 साली दोन खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली. त्यानंतर त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. सुरुवातीला त्याला येरवडा येथील कारागृहात ठेवण्यात आले. काही कालावधीनंतर त्याला कोल्हापूर येथे हलवण्यात आले. तिथून काही दिवसांपूर्वी त्याला नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. दरम्यान दोन्ही खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता मारणे कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याच्या मागे आणि पुढे शेकडो गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला.

‘महाराष्ट्राचा किंग’ असे स्टेटस ठेऊन त्याच्या समर्थकांनी त्याचे स्वागत केले. जेलमधून बाहेर आल्यानंतर मारणे आणि साथीदारांवर पहिला गुन्हा पिंपरी-चिंचवड शहर पोलिसात दाखल झाला. गजानन मारणे याने केलेल्या रॉयल एंट्रीमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.