BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : सराईत आरोपींनी भरदिवसा गोळीबार करून फेरीवाल्याला लुटले

एमपीसी न्यूज – चार सराईत गुन्हेगारांनी भर दिवसा गोळीबार करून फेरीवाला तरुणाला लुटले. ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत गोळीबार करून लुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी चारच्या सुमारास अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर घडली.

अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सनी उर्फ सॅंडी गुप्ता, बाबा पांडे, शिवा खरात, विकास जैसवाल व त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा मोबाईलचे स्पेअर पार्ट विक्रीचे काम करतो. पुणे-नाशिक महामार्गवर भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर अक्षय त्याचे दुकान मांडतो. पाच आरोपी रविवारी दुपारी त्याच्या दुकानासमोर कारमधून आले. ‘तुझ्याकडे जे असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना दमबाजी केली. अक्षय यांनी आरोपींना पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून चिडलेल्या आरोपी सनी याने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर अक्षय यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दुकानाच्या पेटीतून 2 हजार 450 रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.

भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली. भोसरी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आरोपी सनी, शिवा आणि विकास या तिघांवर लूटमार केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर बाबा विरोधात शस्त्र बाळगल्याचा एक गुन्हा दाखल आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement