Dighi : रस्त्यावर टाकलेला मुरूम उचलण्यास सांगितल्यावरून मोडल्या दोन बरगड्या

एमपीसी न्यूज – रस्त्यावर टाकलेला मुरूम उचलण्यास सांगितले म्हणून नवरा बायकोने मिळून एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच नव-याने मुरूम उचलण्यास सांगणा-या इसमाच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर केल्या. हा प्रकार रविवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास च-होली मधील ताजणे मळा येथे घडली. रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. ५) गुन्हा दाखल करण्यात आला.

भिकाजी जिवबा टिपुगडे (वय 38, रा. सिद्धिविनायक नगर, ताजणे मळा, च-होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भीमराव हृषीकेश बारकूल (रा. सिद्धिविनायक नगर, ताजणे मळा, च-होली) आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमराव यांनी त्यांच्या घरासमोर रस्त्यावर मुरूम टाकला होता. मुरुमाचा ढीग असल्यामुळे रस्त्याने जाण्यासाठी अडथळा येत होता. त्यामुळे भिकाजी यांनी ते राहत असलेल्या जमिनीचे प्लॉटिंग करणा-या लोकांना रस्त्यावरील मुरूम उचलण्याबाबत सांगण्याचे ठरवले. प्लॉटिंग करणा-या व्यक्तीच्या कार्यालयात जाऊन ही बाब सांगून दुचाकीवरून येत असताना भीमराव आणि त्यांच्या पत्नीने भिकाजी यांना अडविले. दोघांनी मिळून भिकाजी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर भीमराव याने भिकाजी यांचा गळा दाबून त्यांना खाली पाडले व त्यांच्या छातीवर जोरजोराने मारले. यामध्ये भिकाजी यांच्या उजव्या छातीमधील दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार ए. बी. देशमुख तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.