Ganeshotsav 2020: संजीव हुंबरे यांनी जोपासला सुपारीतून गणेशमूर्ती साकारण्याचा छंद

ganeshotsav 2020: Sanjeev Humbare has a hobby of making Ganesha idols from betel nuts कलाकुसरीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. संजीव यांचे वडील नारायण थर्मोकोलच्या प्रतिकृती तयार करत असत.

एमपीसी न्यूज – नारळाला कल्पवृक्ष, श्रीफल असे आपण मानतो. त्याच्या जातकुळीतले आणखी एक फळ म्हणजे सुपारी. कोणत्याही शुभकार्यामध्ये आपण नारळाच्याही आधी सुपारीच्या गणेशाची स्थापना करतो आणि त्याला मनोमन कार्य निर्विघ्नपणे पार पडण्याची प्रार्थना करतो. एखाद्या व्यक्तीची पत्नी हयात नसली तर तो कमरेला सुपारी बांधून कोणतेही धार्मिक कार्य पार पाडतो. एवढंच नाही तर लग्नसमारंभात सुपारी फुटली म्हणजे त्या कार्याला सुरुवात झाली असे मानले जाते. एकूण काय दिसायला जरी छोटीशी असली तरी सुपारीमागे ब-याच धार्मिक भावना जोडलेल्या असतात.

पण एखाद्या कलाकाराला मात्र या छोट्याशा सुपारीमध्ये चक्क गणेशाचे दर्शन होते आणि सुपारीत गणेशाचे रुप शोधण्याचा त्याला छंदच लागतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या लोहगाव येथील संत तुकाराम विद्यालयाच्या कार्यालयात काम करणा-या संजीव नारायण हुंबरे यांना साधारण 84 – 85 सालापासूनच सुपारीतून गणपती कोरण्याचा छंद लागला आणि आजवर त्यांनी असंख्य गणपती तयार केले.

मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील संजीव यांचे शिक्षण आणि निवास पुण्यातच होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीला लागण्याआधी त्यांची पानपट्टी होती. तिथे काम करताना मिळालेल्या मोकळ्या वेळात सहजच एकदा सुपारी हातात घेतल्यावर तिच्यातून गणपतीची कोरुन काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

कलाकुसरीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. संजीव यांचे वडील नारायण थर्मोकोलच्या प्रतिकृती तयार करत असत. त्यामुळे त्यासाठी आवश्यक ती सगळी हत्यारे त्यांच्याकडे होती. आणि तरुण वय असल्याने चिकाटी पण होती.

मग गणपती कोरुन बनवण्याचा छंदच लागला. नंतर नोकरी लागल्यावर देखील हा छंद कायम राहिला. संजीव यांनी सुपारीत गणेशमूर्तींसोबत शंकराची पिंडी, मोर, बाप्पांचे वाहन मूषक, हंस हे देखील तयार केले आहेत. आधी ते साध्या सुपारीवरच कोरीव काम करीत. पण एकदा सारसबागेजवळ एका कारागिराला सुपारी ओली करुन काम करताना त्यांनी पाहिले.

सुपारी ओली केल्याने काम करणे सोपे जात होते. मग काय आता ते सुपारी ओली करुनच कोरीव काम करतात. ही सुपारी दोन ते तीन तास ओली राहते आणि त्यांचे कोरीव काम एवढ्या वेळात पुरे पण होते.

एका सुपारीचे कोरीव काम करायला एका बैठकीत त्यांना अर्धा ते एक तास लागतो. नंतर त्याचे फाइन काम केले जाते आणि त्यानंतर त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी वॉर्निश, पॉलिश लावायला थोडा वेळ लागतो. तसेच संजीव थर्मोकोलची मखरे पण तयार करतात.

त्यांच्या पत्नीदेखील शिक्षिका असून दोन मुलगे पण सुशिक्षित आहेत. आता थोड्या दिवसांनी ते नोकरीतून निवृत्त होणार आहेत. मागील सुमारे पस्तीस वर्षे ते या छंदात रमलेले आहेत आणि निवृत्तीनंतर तर छंद जोपासण्यासाठी त्यांना आणखी वेळ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.