Mohali: 3 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते महान हॉकीपटू बलबीर सिंग यांचं निधन

Hockey Olympian Balbir Singh Sr passes away at a hospital in Mohali in Punjab

एमपीसी न्यूज- गेल्या दोन आठवड्यांपासून विविध आजारांशी झुंज देणारे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे मानकरी बलबीर सिंग सिनिअर यांचे आज (सोमवारी) निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. दीर्घ काळ आजारी असणाऱ्या सिंग यांना मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीर सिंग सिनिअर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

बलबीर सिंग यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सोमवारी सकाळी 6.30 वाजता सिंह यांचा मृत्यू झाला. बलबीर सिंग सिनिअर यांना 8 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियनपैकी बलबीर सिंग हे एक खेळाडू आहेत.

बलबीर सिंग यांनी लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1 च्या विजयात त्यांनी पाच गोल केले होत. हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. त्याच ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला 4-0 ने पराभूत केले. त्या सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांत त्यांनी दोन गोल केले होते. शिवाय ते 1975 च्या विश्वचषक जिंकणार्‍या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. 1957 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलबीर सिंग भारताच्या 1975 वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 1971 मध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. पद्मश्री बलबीर सिंग सिनियर हे एकमेव खेळाडू होते. जे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्‍या संघाचे सदस्य होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलबीर सिंग सिनिअर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. क्रीडाक्षेत्रातील कामगिरीबद्दल बलबीर सिंग सि. हे नेहमीच लक्षात राहतील. ते अत्यंत बुद्धिमान हॉकीपटू होते. त्यांच्या निधनामुळे अत्यंत दुःख होत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.