Chakan : होमगार्डवर बलात्काराचा गुन्हा 

२३ वर्षीय पिडीतेची तक्रार

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये नेहमी उठबस असणाऱ्या एका होमगार्ड वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या बाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. पश्चिम बंगालच्या एका तरुणीने संबंधित होमगार्ड याने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार चाकण पोलिसांत दिली आहे.

अक्षय गजानन खोपडे (रा. खराबवडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या होमगार्डचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक वर्षापासून मे  २०१९ पर्यंत चाकण एमआयडीसीतील अतिथी लॉज व  वाकी येथील श्रावणी लॉज येथे ही घटना घडल्याची बाब समोर आली आहे. सध्या चाकण परिसरात राहावयास असलेल्या व मूळच्या पश्चिम बंगाल येथील एका २३ वर्षीय पीडित तरुणीने चाकण पोलीस दिलेल्या फिर्यादीनुसार चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मागील एक वर्षापासून चाकण परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर अक्षय खोपडे याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच सारा सिटीमधील निर्जन स्थळी अक्षयच्या टोयाटो कारमध्ये तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता अक्षय याने पीडित तरुणीला मारहाण करून ‘तू पश्चिम बंगाल ला निघून जा, तिकडेच लग्न कर तू मला इथे दिसली तर मी तुला जिवंत ठेवणार नाही’… अशी धमकी दिल्याचे पीडित तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. शुक्रवारी (दि.२१) या बाबतचा गुन्हा दाखल करून खोपडे यास अटक केल्याचे चाकण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मधुमती शिंदे यांनी सांगितले.

… त्यांचा वावर थांबवा :
चाकण पोलिसात अधिकारी व कर्मचारी यांच्यात मागील काही वर्षांपासून होमगार्ड अक्षय खोपडे याचा वावरत होता. यापूर्वी नोव्हेंबर २०१८ मध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने होमगार्डच्या साह्याने एकवीस वर्षीय तरुणीच्या आब्रूचे धिंडवडे काढल्याचा प्रकार चाकणमध्ये उघडकीस आला  होता. दोनच दिवसांपूर्वी चाकण पोलीस ठाण्यात ५० हजारांची लाच घेताना एक पोलीस जाळ्यात अडकलाच मात्र त्याच्या सोबतचा एक झिरो पोलीसही कारवाईच्या कात्रीत आला.  पोलीस ठाण्यातील उठबस ठेवून बाहेर नानाविध उद्योग ‘धंदे’ करणाऱ्या मंडळींचा विषय यामुळे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पोलिसांनी आता नफा-तोटा बाजूला ठेवून समाजाला त्रासदायक असणाऱ्या अशा मंडळींचा पोलीस ठाण्यातील वावर थांबवण्याची मागणी होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.