Home Isolation: रुग्णालयात उपचार नको रे बाबा! 41 टक्के कोरोना रुग्णांची ‘होम आयसोलेशन’ला पसंती!

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 41 टक्क्यांहून जास्त रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी घरीच विलगीकरणात राहून उपचार घेण्यास पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. शहरी भागात होम आयसोलेशनकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा कल वाढत असून ग्रामीण भागात मात्र अजून तरी रुग्णालयांतच उपचार घेण्याकडे कल आहे. पुणे महापालिका क्षेत्रात सर्वाधिक सुमारे 49 टक्के रुग्ण घरीच उपचार घेत आहेत तर ग्रामीण भागात अजून तरी हे प्रमाण केवळ 12.37 टक्केच असल्याचे दिसून येत आहे. 

शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांवरील ताण, बेडची कमतरता याचा विचार करून सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. गंभीर आणि चिंताजनक रुग्णांना रुग्णालयातील बेड उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी करावी लागणारी कसरत, रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या ताणामुळे रुग्णांकडे होणारे दुर्लक्ष, रुग्ण डोळ्यासमोर नसल्याने होणारी कुटुंबीयांची घालमेल, त्याशिवाय काही खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणारे अवास्तव बिल यामुळे बहुतांश रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलचा धसकाच घेतला आहे. त्यापेक्षा घरात विलगीकरणात राहून उपचार घेणे, रुग्ण आणि नातेवाईकांना सोयीचे वाटत आहे.

कोरोनाची गंभीर स्वरूपाची लक्षणे असतील तरच रुग्णालयात दाखल होण्याकडे रुग्णांचा कल दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 28 हजार 425 आहे. त्यापैकी 16 हजार 722 रुग्ण (58.83 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये तर 11 हजार 703 (41.17 टक्के) रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका क्षेत्रात आता 14 हजार 556 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यापैकी 7 हजार 431 रुग्ण (51.05 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित 7 हजार 125 रुग्ण (48.95 टक्के) होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात आता 10 हजार 97 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 6 हजार 137 रुग्ण (60.78 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये तर 3 हजार 856 रुग्ण (39.22 टक्के) आपापल्या घरी विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रांमध्ये आता 759 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 602 रुग्ण (79.31 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये तर 157 रुग्ण (20.69 टक्के) घरात विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आता 535 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 377 रुग्ण (70.47 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये तर 158 रुग्ण (29.53 टक्के) होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता 2 हजार 482 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 2 हजार 175 रुग्ण (87.63 टक्के) विविध रुग्णालयांमध्ये तर 307 रुग्ण (12.37 टक्के) घरात विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.