Home Minister Clarification: पोलीस अधिकाऱ्यांचा सरकार पाडण्याचा प्रयत्न, असे मी बोललोच नाही- अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीचे सरकार काही पोलीस  अधिकारी पडण्याचा प्रयत्न करीत होते, असे मी काहीच बोललो नाही,  असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दैनिक लोकमतने माझे वक्तव्य म्हणून जी बातमी छापली, ती निराधार आहे. माझ्या तोंडामध्ये तसे व्यक्तव्य टाकण्यात आले आहे. मी असे काहीही बोललो नाही. यासंदर्भातील युट्यूबर असलेला माझा व्हिडिओ पाहिला तर आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले होते. त्यामध्ये एका अतिवरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश होता. पण, हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळले गेले, असे गृहमंत्री देशमुख बोलल्याचं वृत्त दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत काही माध्यमांनीही प्रसिद्ध केले होते. त्यावर आज पुण्यात पत्रकारांनी अनिल  देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली. तेव्हा मी असे काही बोललोच नसल्याचे देशमुख यांनी निक्षून सांगितले.

चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदारांना तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशा शब्दांत धमकावणे, त्यांना राजीनामा द्यायला सांगणे असे प्रकार झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, अनिल देखमुख यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चेनंतर हे प्रकरण योग्य प्रकारे मार्गी लावण्यात आले, असे अनिल देशमुख यांच्या मुलाखतीचा संदर्भ देऊन बातम्या देण्यात आल्या होत्या.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात महिन्यांत पोलिसांनी खूप काम चांगले केले आहे. पोलीस थकले आहेत मात्र हिम्मत हारलेले नाहीत.  कर्तव्य निभावताना २०८ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले आहेत. या शहीद पोलिसांच्या कुटुंबाला 65 लाख रूपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असेही देशमुख म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.