Home Minister: आता ‘होम मिनिस्टर’मध्ये देखील करा ‘वर्क फ्रॉम होम’ आणि मिळवा पैठणी

Home Minister: Now also do 'Work from Home' in 'Home Minister' and get Paithani

एमपीसी न्यूज- ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ म्हटलं की आता लगेच आठवतो तो ‘होम मिनिस्टर’ हा तमाम महिलावर्गाचा आवडता कार्यक्रम. दि. १३ सप्टेंबर २००४ रोजी ‘होम मिनिस्टर’चा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आलेला. त्यात कार्यक्रमाच्या अखेरीस पैठणी कोणाला मिळणार बरं हे कोडं सुटेपर्यंत कार्यक्रम संपलेला असतो. आणि पुढच्यावेळी आपण पण भावजींना बोलवू म्हणजे फुकटात पैठणी मिळेल ही आशा कायम राहते.

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सादर करणारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांची दुसरी ओळख ही ‘भावोजी’अशीच झाली. मध्यंतरी थोडे दिवस जितेंद्र जोशीने याचे सूत्रसंचालन केले. पण आदेश बांदेकरांची या कार्यक्रमावर खूप छाप पडल्यामुळे परत त्यांनाच हा कार्यक्रम करावा लागला.

आता लॉकडाउनमध्येही महिलांना पैठणी जिंकण्याची संधी घरबसल्या मिळणार आहे. लॉकडाउनमध्ये आधी जुन्या गाजलेल्या मालिकांचे एपिसोड्स प्रसारित करण्यात आले. मात्र आता ‘होम मिनिस्टर’चे नवे एपिसोड्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘घरच्या घरी’ या विशेष विभागात आदेश बांदेकर व्हिडीओ कॉलद्वारे प्रेक्षकांशी संपर्क साधणार आहेत. लॉकडाउनमध्ये पुरुषांनी स्त्रियांना कशी मदत केली, हे भावोजी या कार्यक्रमात विचारणार आहेत.

त्याचप्रमाणे पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.‘वर्फ फ्रॉम होम’ या प्रकारात कार्यक्रमाचं शूटिंग सुरू झालं आहे.

प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाला १५ वर्षे पूर्ण झाली असून पहिल्यांदाच एका नव्या स्वरुपात हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.