Home Remedies For Cough : सर्दी खोकल्यासाठी करा हे काही घरगुती उपचार

Here are some home remedies for cold cough

एमपीसी न्यूज – सध्या करोनाच्या साथीने फारच जोर धरला आहे. अशावेळी साध्या सर्दी आणि खोकल्याचा त्रास झाल्यास डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकता. यासाठी तुम्हाला अँटीबायोटीक गोळ्यांचा वापर करण्याची काहीच गरज नाही.

मध
कच्च्या मधात अँटीमायक्रोबायल आणि अँटीऑक्सीडंट गुण चांगल्या प्रमाणात असतात. मध तुमची प्रतिकारकशक्ती वाढवतं आणि खोकल्याचा प्रभावही कमी करतं. पण लक्षात ठेवा की, 1 वर्षाहून कमी वयाच्या मुलांना कधीही मध देऊ नये. नियमितपणे मधाचं सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि कफचा त्रास सहसा जाणवत नाही. तसेच मध कधीही गरम करु नये किंवा फ्रीजमध्ये ठेवू नये.

 

घरगुती चिकन सूप
चिकन सूप हा सर्दी खोकल्यांसाठी अगदी उत्तम घरगुती उपाय आहे. त्यातही जर तुम्ही भाज्यांसोबत चिकन सूपचं सेवन केल्यास तुमच्या शरीराला उर्जा मिळते. तसंच हे शरीरातील न्यूट्रीफिल या घटकाची गती कमी करतं. ज्यामुळे सर्दी-खोकला प्रभावित ठिकाणी याचा परिणाम लगेच जाणवतो. त्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळतो.

आल्याचा चहा
आलं हे आयुर्वेदातील सर्वात प्रभावी औषधी वनस्पतींपैकी एक आहे. यामध्ये अँटीव्हायरल गुण चांगल्या मात्रेमध्ये असतात. याचं सेवन केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास नक्कीच कमी होईल. आलं तुम्ही कच्चं खाल्लं किंवा आल्याचा चहा करुन घेतला तर खूप फरक जाणवेल. आल्याची पेस्ट बनवून त्याचा रस काढून घ्या. या रसात लिंबू आणि मध घालून चहा तयार करा. तुमचा सर्दी खोकला लगेच कमी होईल.

लसूण
लसूण हा अँटीमायक्रोबाईलयुक्त आहे. तुम्ही लसणाचा उपयोग केल्यास सर्दीची लक्षण कमी होतात. लसूण नियमित रुपात सेवन केल्यास सर्दी खोकल्याच्या सुरुवातीच्या लक्षणातच बरं वाटेल. लसूण उष्ण प्रकृती असल्याने शरीराला उष्णता आणि पोषक तत्व मिळतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला झाल्यास नक्की लसूण वापरा. लहान मुलांना लसूण उष्ण पडू नये म्हणून त्यांच्या गळ्यात लसणाची माळ बांधली जाते.

व्हिटॅमीन सी
तुमच्या शरीराच्या विकासासाठी व्हिटॅमीन सी फार महत्त्वपूर्ण आहे. आरोग्यासाठी व्हिटॅमीन सी खूपच फायदेशीर आहे. संत्र, लिंबू, द्राक्ष, आवळा आणि पालेभाज्या यांचं सेवन केल्यास तुमची व्हिटॅमीन सी ची गरज पूर्ण होते. गरम चहामध्ये लिंबाचा रस आणि मध घातल्यास तुम्हाला सर्दीदरम्यान होणारा कफचा त्रास लगेच कमी होतो. व्हिटॅमीन सीचं नियमित सेवन केल्यास तुमचं सर्दीच्या संसर्गापासून संरक्षण होईल.

मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या
आपल्या प्रत्येकालाच माहित आहे की, घसा खवखवू लागला किंवा सर्दी खोकल्याचा त्रास सुरु होताच पहिला सल्ला मिळतो तो मीठ आणि कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा. कोमट पाण्यासोबत मीठ घातल्याने कफाचं प्रमाण लगेच कमी होतं. कारण हे अँटीबॅक्टेरियलचं काम करतं.

दूध हळद
स्वयंपाकघरात सर्दी खोकल्यावर अगदी सहज उपलब्ध असलेला उपचार म्हणजे हळद. हळदीमध्ये अँटीऑक्सीडंटचं प्रमाण खूप चांगलं असतं. त्यामुळे हे खूपच गुणकारी आहे. हळद आणि गरम दूध हे सर्दी-खोकल्यावरील सर्वात सोपा असा घरगुती उपाय आहे. रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात एक छोटा चमचा हळदी घालून सेवन करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.

मसाला चहा
मसाला चहा अगदी दैनंदिन जीवनातही काही लोक आवर्जून पितात. पण तुम्हाला माहीत आहे का हाच मसाला चहा, सर्दीवरही गुणकारी आहे. मसाला चहामध्ये तुळस, आल आणि काळीमिरी घालून प्यायलास फारच फायदेशीर आहे. या तिन्ही घटकांमध्ये भरपूर औषधीय गुण आहेत.

चांगली आणि शांत झोप
कधी कधी अनेक उपचार करण्याऐवजी आपल्या शरीराला गरज असते ती शांत झोपेची. चांगल्या आणि शांत झोपेनेही आपल्याला बरं वाटतं. एखाद्या औषधाचा परिणाम चांगली झोप घेतल्याने त्वरित दिसून येतो. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यावर चांगली झोप नक्की घ्या.

वाफ
सर्दी झाल्यावर लगेच होणारा परिणाम म्हणजे नाक चोंदणं. नोक चोंदल्यासारख किंवा बंद झालं असं आपण म्हणतो. जर तुम्ही गरम पाण्याची वाफ घेतल्यास हळूहळू नाक मोकळं होतं आणि श्वास घ्यायलाही त्रास होत नाही.

घरगुती तुळशीचा काढा

तुळशीची पानं, त्याचा रस आणि चहा याचा योग्य वापर केल्यास अनेक गंभीर आजारांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

तुळशीचा काढा बनवण्याचं साहित्य

तुळशीची 10-12 पानं, गवतीचहा, एक इंच आल्याचा तुकडा किसून घ्या, 4 कप पाणी, गूळ 3 चमचे किंवा तीन छोटे तुकडे

तुळशीचा काढा बनवण्याची कृती

सर्वात आधी तुळशीची पान आणि गवतीचहा चांगलं धुवून घ्या. नंतर भांड्यात मध्यम आचेवर पाणी उकळण्यासाठी ठेवा. हलकंस गरम झाल्यावर त्यात तुळशीची पानं, लेमन ग्रास म्हणजे गवतीचहा आणि आलं घालून 4-5 मिनिटं उकळून घ्या. यानंतर गूळ घालून गॅस बंद करा. गूळ विरघळेपर्यंत चमच्याने फिरवत राहा. एक-दोन मिनिटाने थंड झाल्यावर गाळून गरमगरम प्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये काळीमिरीही घालू शकता. अजून चव हवी असल्यास वेलचीही कुटून घालू शकता. लेमन ग्रास न मिळाल्यासही तुम्ही तुळशीचा काढा बनवू शकता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.