BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर

पतसंस्थेची 24 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

एमपीसी न्यूज – शिवनेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या सभासदांना 12 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संचालक मंडळाने मांडलेल्या विविध विषयांना सभासदांनी बहुमताने मंजुरी दिली.

यावेळी अध्यक्ष कैलास आवटे, उपाध्यक्ष बाळू गुंजाळ, संचालक मुकुंद आवटे, सुहास गटकळ, निंबा डोळस, निलेश मुटके, अरुण डेहनकर, शांताराम कुंभार, अॅड. सूर्यकांत काळे, प्रवीण गटकळ, शांतिश्वर पाटील, ज्योती हांडे, संगीता इंगळे, तज्ज्ञ संचालक बाळू भोर, नगरसेविका प्रियांका बारसे, देविदास गोफणे, प्रशिक्षणाधिकारी विलास लिंबळे, प्रा. प्रदीप कदम आदी उपस्थित होते.

सभासदांच्या पाचवी, आठवी स्कॉलरशिप, दहावी, बारावी आणि पदवीच्या परीक्षेत विशेष गुण मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले. संस्थेची कर्जवसुली 100 टक्के आहे. ठेवी, कर्ज आणि वसुली उत्तम असल्याने संस्थेला अ दर्जा मिळाला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत इमारत निधी, लाभांश समीकरण निधी, सभासद कल्याण निधी, कर्मचारी कल्याण निधी, रौप्य महोत्सवी वर्ष यासाठी राखीव निधी ठेवण्यात आला.

विलास लिंबळे यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सभासदांचे अधिकार, कर्तव्ये याबाबत त्यांनी सांगितले. सभासदांनी पाच वर्षात पतसंस्थेत व्यवहार करणे आवश्यक आहे. पतसंस्थेकडून क्रियाशील आणि अक्रियाशील सभासदांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. अक्रियाशील सभासदांना संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाग घेता येणार नाही, असेही ते म्हणाले. प्रा. प्रदीप कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अध्यक्ष कैलास आवटे म्हणाले, “सर्व सभासद संचालक मंडळावर अंकुश लावण्याचे काम करतात. आजी-माजी सैनिकांच्या ठेवींवर साडेदहा टक्के व्याजदर देऊन ते करत असलेल्या देशसेवेबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत अनेक पुरस्कार आणि कौतुकाची थाप मिळवली आहे. दीड हजार संस्थांमधून शिवनेरी पतसंस्थेला सहकार भूषण पुरस्कार मिळाला आहे. सर्वांच्या सहकार्यातून संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सूत्रसंचालन संचालक मुकुंद आवटे यांनी केले. आभार संचालक सुहास गटकळ यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

.