Pune News : खुशखबर ! प्रामाणिक करदात्यांना मिळकत करांमध्ये 15 टक्के सवलत

एमपीसी न्यूज : कोरोना काळात ज्या निवासी मिळकत धारकांनी 1 एप्रिल 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या काळात संपूर्ण मिळकत कर भरला आहे. त्यांना आगामी 2021-22 च्या बिलांमध्ये शासनाचे कर वगळून सर्व करांमध्ये 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकर परिषदेत दिली.

प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पुणेकरांनी घ्यावा, असे आवाहनही महापौर मोहोळ यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला उपहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले,ही सवलत जे निवासी मिळवत धारक संपूर्ण मिळकतकर 1 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 दरम्यानच्या कालावधीत भरतील त्यांना ही सवलत लागू होणार आहे. या योजनेत महापालिकेच्या सर्व साधारण कर, सफाई पट्टी, वृक्ष कर, रस्ता कर, जलनिस्सारण कर, मलनिस्सारण कर, अग्निशमन कर, शिक्षण उपकर आणि विशेष सफाई कर आदी करांचा समावेश आहे. या योजनेचा फायदा पुणेकरांनी घ्यावा असे आवाहन केले.

दरम्यान महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सन 2021-22 आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकत करात 11 टक्के वाढ सुचवली होती. आजच्या कर विषयावरील ऑनलाइन मुख्य खास सभेत ही करवाढ फेटाळण्यात आली. तसेच प्रामाणिक मिळकतकर धारकांना 15 टक्के सवलतीची उपसूचना मांडून त्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे लाखो पुणेकरांना दिलासा मिळू शकणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.