Pune : विज्ञाननिष्ठा, सामाजिक जाण सौंदर्यापेक्षाही महत्वाची – डॉ. जयश्री फिरोदिया

मराठी विज्ञान परिषदेतर्फे मालतीबाई सराफ स्मृती व्याख्यान

एमपीसी न्यूज – “चूल आणि मूल या चौकटीतून महिला केव्हाच बाहेर पडली असून, घर सांभाळतानाच नोकरी, व्यवसायाकडे वळली आहे. घरातल्या प्रत्येक सदस्याला काय हवे नको ते पाहणारी महिला शिक्षित असेल, तर त्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाचीही प्रगती झपाट्याने होते. केवळ सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य राहिले नसून, शिकलेली विज्ञाननिष्ठ स्त्री समाजाच्या जडणघडणीत वरदान ठरत आहे,” असे मत कायनेटिक ग्रुपच्या संचालिका डॉ. जयश्री अरुण फिरोदिया यांनी केले आहे.

मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने नवी पेठ येथील एस. एम. जोशी चर्चा सभागृहात मालतीबाई सराफ स्मृती व्याख्यान आयोजिले होते. त्यावेळी डॉ. फिरोदिया ‘विज्ञान शिक्षित नारी : समाजाला वरदान’ या विषयावर बोलत होत्या. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, उपाध्यक्ष डॉ. नीलिमा राजुरकर, संजय,दिपाली अकोलकर, सुजाता बरगाले, शर्वरी शुक्ला हे उपस्थित होते.

डॉ. जयश्री फिरोदिया म्हणाल्या, “विज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या महिला भोंदू बाबाच्या जादूटोणाला बळी पडत नाहीत. महिलांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनामुळे कुटुंबाचा विकास होतो. विज्ञानामुळे जगात दररोज नवनवीन प्रयोग होत असून चांगले शोध लागत आहेत, यामुळे मानवाचीही प्रगती होत आहे. घरातील पुरुषांना व्यसनापासून दूर ठेवण्यात महिलांचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे कुटूंब चांगले राहते. घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याचा वापर कसा करायचा हे फक्त तिच्या शिक्षणामुळे शक्य होते.”

प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी आपल्या मातोश्री मालतीबाई सराफ यांच्या जीवनातील आठवणी सांगितल्या. सूत्रसंचालन दिपाली अकोलकर यांनी केले. आभार शर्वरी शुक्ला यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.