Pimpri : पूरस्थितीत उल्लेखनीय बचावकार्य केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिवस’ दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सांगली, कोल्हापूर परिसरात आलेल्या परिस्थितीत केलेल्या मदतकार्याबद्दल पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाने केलेल्या उल्लेखनीय मदतकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

संत तुकाराम नगरमधील आचार्य अत्रे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर,  प्रभारी शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता मकरंद निकम, प्रवीण तुपे, श्रीकांत सवने आदी उपस्थित होते.

ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने 16 सप्टेंबर रोजी अभियंता दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शहरात काम करणा-या विविध प्रशासकीय घटकांचा सन्मान करण्यात आला. यातच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचा देखील सत्कार करण्यात आला. मागील काही दिवसांपूर्वी सांगली, कोल्हापूर भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. पुरामध्ये हजारो संसार वाहून गेले. लाखो लोक रस्त्यावर आले. या कठीण प्रसंगात पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे जाऊन बचावकार्य केले. याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला.

महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि कर्मचा-यांनी पुरस्कार स्वीकारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.