Pimple Gurav : मराठवाडा जनविकास संघातर्फे ‘जिद्द महिला गौरव पुरस्काराने’ महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ‘जिद्द महिला गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मराठवाडा जनविकास संघाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. किरण माकन, डॉ. अपूर्वा माकन, डॉ. उर्मिला झिंझुर्णे यांना, सामाजिक क्षेत्रासाठी सुजाता निकाळजे, आशा साबळे यांना, उद्योजिका क्षेत्रासाठी जीओ फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती काळे, माधवी बाईत यांना, पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रज्ञा दिवेकर व संगीता पाचंगे यांना शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज (आळंदीकर), अलका जोशी, आण्णा जोगदंड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण खडसे, दत्तात्रय धोंडगे, वामन भरगंडे, बळीराम माळी, शंकर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

अलका जोशी म्हणाल्या, की आज सामाजिक, राजकीय, कला अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. महाराष्ट्रातील माधुरी कानिटकर यांनी नुकताच लेफ्टनंट जनरल या पदाचा कार्यभार स्वीकारला. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांचा आदर्श सर्व स्त्रियांनी घेतला पाहिजे. अगदी विपरीत परिस्थितीतही स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवून मार्गक्रमण करणे आवश्यक आहे. मात्र, नोकरी आणि घर सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये. स्त्रियांवरील वाढते अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे मोठे आव्हान समाजापुढे आहे.

दरम्यान, स्वराज तांबे आणि सिद्दी तांबे या लहान मुलांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. सुजाता निकाळजे, शारदाताई मुंडे, प्रीती काळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.