Vadgaon Maval News : लग्न समारंभात शब्दसुमनांचा साज चढवणा-या 25 निवेदकांचा सन्मान

राक्षे-गराडे परिवाराने मावळातील निवेदकांचा राखला सन्मान

एमपीसी न्यूज – लग्न समारंभात गेल्यानंतर आपले नाव घ्यावे, पदाधिकारी, नेता असेल तर पदासह आपल्या नावाचा उल्लेख व्हावा, असा आपला आग्रह असतो. पण जी व्यक्ती या सगळ्या शाब्दिक आदरतिथ्याचा डोलारा सांभाळत असते तो निवेदक मात्र सन्मानापासून उपेक्षित राहतो. हाच धागा पकडून कासारसाई येथे झालेल्या राक्षे आणि गराडे परिवारातील लग्न सोहळ्यामध्ये मावळ तालुक्यातील 25 निवेदकांचा सन्मान करण्यात आला. बहुमूल्य पण विनामूल्य केल्या जाणाऱ्या कामाची दखल घेऊन सन्मान केल्याने निवेदकांनी आनंद व्यक्त केला.

घरासमोरील लग्नमंडपापासून मोठ्या गार्डन पर्यंत होणाऱ्या लग्न समारंभामध्ये ‘निवेदक’ म्हणून विनामूल्य महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मावळ तालुक्यातील निवेदकांचा सन्मान कासारसाई येथे झालेल्या राक्षे आणि गराडे परिवारातील लग्न सोहळ्यामध्ये करण्यात आला.

स्व.सौ.सुलक्षणाताई सुनील राक्षे यांच्या स्मरणार्थ राक्षे व गराडे परिवाराच्या लग्न समारंभात खासदार श्रीरंग बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, हभप संतोष महाराज काळोखे, माजी सभापती एकनाथ टिळे, उद्योगपती सुधाकर शेळके, पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना घारे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे, मावळ तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष साहेबराव कारके, पंढरीनाथ ढोरे, गणपत राक्षे, रोहिदास गराडे, आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

लग्न साध्या पध्दतीने असो वा मोठ्या दिमाखात असो, त्याठिकाणी ‘निवेदक’ हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. लग्न सोहळ्यातील कोणतीही एखादी गोष्ट कमी केली तरी लग्न समारंभाला फरक पडत नाही. परंतु निवेदकाशिवाय लग्न होऊ शकत नाही, कारण त्या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन निवेदक करत असतो.

सुमारे एक ते दीड तास लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मान्यवर, पदाधिकारी, पाहुणे यांचा पदांसह नामोल्लेख करून शाब्दिक स्वागत करण्याचा पूर्ण प्रयत्न निवेदक मंडळी करत असतात. याशिवाय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साखरपुडाप्रसंगी नवरदेवांचा सन्मान करणे, लग्नाचे वेळी जावई सन्मान करणे, उपस्थितांचे स्वागत, वधू वरांना आशीर्वाद देणे यासाठी सर्वांना संधी देण्याचा प्रयत्न करून समतोल साधण्यासाठी धडपड करतात.

विशेष म्हणजे तास-दीड तास सातत्याने शक्य होईल तितक्या उपस्थितांचा पदांसह नामोल्लेख करून स्वागत करत असताना एखाद्या व्यक्तीचे नजरचुकीने नाव राहिले किंवा पद राहिले, सन्मानासाठी एखाद्या मान्यवरांचे नाव घ्यायचे राहिले तरी संबंधित व्यक्ती त्याच निवेदकावर लगेच नाराजी व्यक्त करतो. परंतु, प्रत्येकाचा पदासह नामोल्लेख करून प्रामाणिकपणे शाब्दिक स्वागत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच निवेदकांचा ‘संयोजकांनी सर्वांचे स्वागत केलेले आहे’ असा एकेरी उल्लेख करून उपस्थित मान्यवर निवेदकांची अवहेलना करत असतात. निवेदकांना सत्काराची किंवा मानधनाची अपेक्षा नाही, परंतु किमान संयोजक असा एकेरी उल्लेख न करता संबंधित मान्यवराने निवेदकांच्या नावाचा उल्लेख करून योग्य सन्मान ठेवावा अशी अपेक्षा असते.

अशाच प्रकारे सातत्याने अवहेलना होऊनही कुठलाही मोबदला न घेता किंवा कुठल्याही सत्काराची अपेक्षा न करता वर्षानुवर्षे निवेदक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या मावळ तालुक्यातील निवेदक मंडळींचा प्रसिद्ध निवेदक गणपतराव राक्षे यांच्या संकल्पनेतून कासारसाई येथील भगवंत लॉन्स मध्ये झालेल्या राक्षे व गराडे परिवाराच्या विवाह सोहळ्यात सन्मानचिन्ह, चांदीची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

दोन दिवसांपूर्वी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मध्ये झालेल्या वाघमारे व घारे या लग्न समारंभातही मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे यांनी निवेदकांचा सन्मान केला होता.

सोहळा नियोजनबद्ध पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे “निवेदक”

याप्रसंगी मावळ तालुका निवेदक संघाचे संस्थापक गणेश विनोदे म्हणाले, संपूर्ण लग्न सोहळा नियोजनबद्ध पार पाडण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या, मान्यवरांचा पदांसह उल्लेख करून त्यांना योग्य सन्मान देणाऱ्या ‘ निवेदक’ मंडळींचाच विसर मान्यवरांना पडतो आणि ‘संयोजक’ असा एकेरी उल्लेख करू ते निवेदकांची अवहेलना करतात, हीच मोठी खंत आहे. निवेदकांना सत्कार अथवा मानधनाही अपेक्षा नाही, फक्त योग्य सन्मान मिळावा हीच अपेक्षा असते. राक्षे आणि गराडे परिवाराने निवेदक मंडळींची ही शोकांतिका लक्षात घेऊन निवेदकांचा सन्मान केला ही बाब आदर्शवत आहे, असे म्हणून त्यांनी निवेदकांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.