Pimpri News: शहरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा महापौरांच्या हस्ते सन्मान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील गुणवंत खेळाडू, शैक्षणिक क्षेत्रातील पारंगत आणि कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते यांच्या योगदानाने महापालिकेचा नावलौकिक वृध्दींगत झाला आहे असे गौरवौद्गार महापौर उषा ढोरे यांनी काढले.

महापौर ढोरे यांच्या हस्ते विविध गुणवंत खेळाडू तसेच शिक्षण क्षेत्रात जागतिक विक्रम करणा-या व्यक्तीचा सन्मानपत्र, शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उज्वला गावडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज वाखारे, गणेश गावडे उपस्थित होते.

सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटामध्ये श्रावणी देसाई यांची उपकर्णधारपदी तर क्रिकेट संघात खुशी मुल्ला, स्वरांजली मुळे यांची निवड झाल्याने त्यांचा महापौर  ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  वयाच्या 35 व्या वर्षी विविध क्षेत्रात एकूण 76 पदव्या मिळविणा-या अॅड. जया उभे यांचा तसेच फुगेवाडी येथील दुर्घटनेत मातीच्या ढिगा-याखाली अडकलेल्या 13 वर्षीय पौर्णिमा संभाजी मडके या मुलीचा जीव वाचविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करणा-या मयूर पुंडे आणि भीमराव चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

याशिवाय कोरोना काळात 95 पेक्षा जास्त कोरोना मयतांचे दहन, दफन विनामुल्य करुन सामाजिक बांधिलकी जपणारे सामाजिक कार्यकर्ते युनुस पठाण तसेच दिवाणजी यांचा देखील शाल, पुस्तक व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.