Vadgaon : आशादायक ! मावळात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही; तपासणीचे तीन टप्पे पूर्ण

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यात प्रशासन सतर्कतेने काम करत आहे. मावळात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी तपासणी केली जात आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील २ लाख ४ हजार ४९ घरांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत तालुक्यातील तपासणीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. यामध्ये मावळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनास यश आले असून अद्याप एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नाही.आल्याची माहिती मावळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

तालुक्यात तीन टप्यातील आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार ६८ हजार ७५९ कुटुंबांची मावळ तालुक्यातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी व आरोग्य कर्मचारी आदींनी गावोगावी भेटी देऊन आरोग्य तपासणी केली आहे. तसेच खबरदारी म्हणून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी आपल्या कार्यक्षेत्रात खासगी दवाखाने व गृहभेटी देऊन रुग्णांची तपासणी केली आहे.

तिसऱ्या टप्यातील आरोग्य तपासणी दरम्यान पुणे, मुंबई व इतर राज्यांतून मावळात आलेले ४ हजार ३९० नागरिक होते. त्यातील ४ हजार १६ जणांचा १४ दिवसांचा क्वारांटाइन कालावधी पूर्ण झाला असून यातील ३७४ जण देखरेखीखाली आहेत. परदेश प्रवास करून आलेले ११४ व्यक्ती होत्या. त्यांच्या सहवासातील १४१ असे एकूण २५५ होते. त्यांचा १४ दिवसांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. आता परदेश दौऱ्यातील एकही व्यक्ती नाही, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व नियंत्रण कक्षाचे संनियंत्रक राहुल चोकलिंगम यांनी दिली.

मावळ तालुक्यातील तपासणीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. मावळात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनास यश आले असून अद्याप एकही रुग्ण कोरोना बाधित आढळला नाही. तरीसुद्धा पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत तपासणी चालूच ठेवणार आहे. तसेच आपल्या आजूबाजूला मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड आदी इतर जिल्ह्यांतून कुणाचे नातेवाईक आल्यास त्वरित पोलीस व आरोग्य खात्यास संपर्क करावा. डॉ. चंद्रकांत लोहारे : तालुका आरोग्य अधिकारी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.