Sports News : भारतीय संघाचे वरातीमागून घोडे; अफगाणिस्तानवर 101 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – अंत भला तो सब भला अशी एक जुनी म्हण आहे, भारतीय संघाला आजच्या विजयाने आनंद वाटला असेल का?नक्कीच नाही, जो संघ ही स्पर्धा होण्याआधी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता,तो संघ अंतीम सामन्यात नसावा यासम दुसरे कुठलेही दुःख रोहीत आणि कंपनीसाठी  नाही,आणि नसेलही,पण सत्य हेच आहे की आशिया कप 2022 मध्ये यावेळी तरी भारतीय संघ विजेता नक्कीच नसेल,पण तरीही सुपर फोर मधल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने आपल्या दर्जाला न्याय देत अप्रतिम खेळ करत अफगाणिस्तान संघाला 101 धावांनी पराभूत मरत चारिमुंडया चीत केल्या आणि आपल्या संघाच्या अखेरच्या सामन्याचा  शेवट तरी आनंदी केला.

आज भारतीय संघाने कर्णधार रोहीतसह पंड्या आणि चहलला विश्रांती देताना दीपक चहर, दिनेश कार्तिक आणि  अक्षर पटेलला अंतिम संघात स्थान दिले. के. एल. राहुल नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या कर्णधार मोहम्मद नबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज राहूल सोबत सलामीला विराट कोहली आला. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना सोडला तर विराट चांगल्या लयीत दिसला होताच,आजच्या सामन्यात तो आणखीन मोकळा खेळला. आज त्याने जबरदस्त खेळ करत सर्वाना मंत्रमुग्ध केले.त्याने राहुल सोबत 119 धावांची शतकी सलामी देत डावाची सुरुवात अतिशय आश्वासक केली.

राहुलसुद्धा अप्रतिम खेळत होता. दरम्यान त्याने आपले 7 वे अर्धशतक पूर्ण केले, त्यानंतर तो 62 धावां करुन फरीद अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 6 चौकार आणि दोन षटकार मारत केवळ 41 चेंडूत या धावा ठोकल्या. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत जोरदार सुरुवात केली,पण दुसऱ्याच चेंडूवर तो फरीदच्याच गोलंदाजीवर बाद झाला,यानंतर मात्र विराटने आपल्या हातात भारतीय डावाची सर्व सूत्रे घेत एक जबरदस्त  आणि अविस्मरणीय खेळी करत आपल्या चाहत्यांना चिरकाल लक्षात राहील अशी खेळी करत आपल्याला गवसेलेल्या फॉर्मवर जणू शिक्कामोर्तबच केले.त्याने कुठल्याही फॉरमॅट मध्ये तब्बल तीन वर्षांनंतर पहिले आणि एकूण 71वे तर टी -20च्या फॉरमॅट मधले आपले पहिले शतक पुर्ण करत शतकाला लागलेले ग्रहण सोडले. अतिशय देखणी अशी फलंदाजी करत कोहलीने 61 चेंडूत 12 चौकार आणि सहा षटकार मारत नाबाद 122 धावा केल्या ,ज्या या फॉरमॅट मध्ये कुठल्याही भारतीय खेळाडूंनी केलेल्या सर्वोच्च धावा आहेत.

या शतकाबरोबरच त्याने 71 शतके करून सर्वोच्च शतकी खेळी करणाऱ्या क्रिकेटपटू म्हणून रिकी पॉंटिंग सोबत संयुक्त द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. विराटचे शतक पूर्ण होताच त्याने व्यक्त  केलेला आंनद सर्व काही सांगून गेला.त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे भारताने आपल्या 20षटकात 2 बाद 212 धावांचा विशाल डोंगर उभा केला.

या धावसंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाची सुरुवात अतिशय खराब झाली,लागोपाठ दोन सामन्यात महागडी गोलंदाजी करून टीकेचा धनी ठरलेल्या अनुभवी भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात जबरदस्त गोलंदाजी करत दोन गडी बाद करुन अफगाणिस्तान संघाला मोठठे हादरे दिले,ज्यातून अफगाणिस्तान संघ सावरू शकला नाहीच.भुवनेश्वरला आज चांगलाच सुरू गवसला होता ,त्याने एकापाठोपाठ एक पाच बळी घेत अफगाणिस्तान संघाला पुरते अडचणीत आणले.

त्याने आपल्या चार षटकात फक्त चार धावा देत 5 बळी बाद करत,त्यालाही योग्य वेळी सुर सापडलाय याची प्रचिती दिली, आशिया कप स्पर्धा आता आपल्या संघासाठी संपली असली तरीही आता विश्वकप तोंडावर आलेला आहे, त्यादृष्टीने भुवनेश्वरला असा सुर गवसणे ही भारतीय संघासाठी अतिशय आनंदी बातमी आहे.त्याच्या या जबरदस्त गोलंदाजी मुळे अफगाणिस्तान संघाची अवस्था 6 बाद 21 अशी झाली होती. यानंतर अफगाणिस्तान संघ किती तग धरेल आणि भारतीय संघ किती मोठ्या फरकाने जिंकणार हेच दोन प्रश्न बाकी होते.मात्र सर्व काही संपले आहे असे वाटत असतानाच अफगाणिस्तानच्या इब्राहिमने एकाकी लढत देत आपले अर्धशतक तर पुर्ण केलेच,शिवाय त्याने  पूर्ण  20 षटके खेळून भारतीय संघाला नामोहरम करत सर्वबाद होण्याची नामुष्कीही टाळली, तर के एल राहूलने चक्क दिनेश कार्तिकला अखेरचे षटक देवून सर्वानाच अचंबित केले, हा काय प्रकार होता हे कोणालाही समजले नाही, पण त्या षटकात इब्राहिमने 18 धावा चोपत राहुलला चांगलाच धडा शिकवला.

अफगाणिस्तान संघाने आपल्या डावात 8 गडी गमावून  111 धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघ 101 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि  या स्पर्धेतल्या आपल्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून किमान हौद से गयी वो बुंद से मिली म्हणत आनंद मानू लागला.आजच्या दिवसाचा आणि खेळाचा मानकरी असलेल्या विराटलाच सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

भारत दोन बाद 212

कोहली नाबाद 122,के एल राहुल 62,पंत नाबाद 20

फरीद अहमद 57/2

विजयी विरुध्द अफगाणिस्तान 8 बाद 111

इब्राहिम नाबाद 64,रशीद खान 15,मुजीबुर 18

भुवनेश्वर 4/5,अश्विन 27/1,हुडा 3/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.