SNBP ALL INDIA HOCKEY 2022 : १६ वर्षांखालील हॉकी स्पर्धेमध्ये यजमान एसएनबीपी अकादमीचा चमकदार विजय

एमपीसी न्यूज : अखिल भारतीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सहाव्या एसएनबीपी १६ वर्षांखालील गटाच्या हॉकी स्पर्धेत यजमान एसएनबीपी संघाने चमकदार विजय मिळवून उद्घाटनाचा दिवस गाजवला. 
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेतील अन्य सामन्यात जमशेदपूरच्या नवाल टाटा हॉकी अकादमीने प्रथमच स्पर्धेत सहभागी झालेल्या मणिपूरच्या बिश्नपूर हॉकी अकादमीचा १२-० असा पराभव केला. गेल्या वर्षी तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या एसएनबीपी संघाने  तेलंगणाच्या भोंगीर हॉकी अकादमीचा ११-० असा पराभव केला.
पहिल्या सामन्यात नवाल टाटा संघाकडून सत्यम पांडे आणि जोलेन टोपनो यांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यांना तुषार परमार, उज्जल पाल यांनी प्रत्येकी दोन, तर रोहित तिर्की, मोहम्मद जाईदने एकेक गोल करून सुरेख साथ केली. दुसऱ्या सामन्यात अभिषेक कुमार सिंगने पाच गोल नोंदवून एसएनबीपीच्या मोठ्या विजयात प्रमुख वाटा उचलला. मध्यंतराच्या ६-० अशा आघाडीनंतर एसएनबीपीने उत्तरार्धात आणखी पाच गोल केले. अभिषेक पटेल, अथर्व कुमार, अली अब्बास, अथर्व पावरा, नीरज लांडहगे यांनी एकेक गोल केला. पियुष शिंपीने दोन गोल केले.
स्पर्धेचे उद्घाटन भारताचा माजी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेता राजपाल सिंगच्या हस्ते करण्यात आले.

निकाल
ब गट – नवाल टाटा हॉकरी अकादमी १२ (सत्यम पांडे २, ४५ ५५वे मिनिट, तुषार परमार २०, ४३वे मिनिट, उज्जव पाल ३०, ५७वे मिनिट, जोलन टोपनो ३१, ४१, ४२वे मिनिट, रोहित तिर्की ३२वे मिनिट, मोहंमद जाईद ४८वे मिनिट) वि.वि. बिश्नपूर हॉकी अकादमी, मणिपूर ० (मध्यंतर ३-०)
अ गट – एसएनबीपी अकादमी, पुणे ११ (अभिषेक कुमार सिंग ४, ६, ८, ४९वे मिनिट, अभिषेक पटेल १८वे मिनिट, अथर्व कुमार २२वे मिनिट, अली अब्बास ३०वे मिनिट, पियुष शिम्पी ३५, ३८वे मिनिट, अमृत पावरा ४०वे मिनिट, नीरज लांडगे ४३वे मिनिट) वि.वि. भोंगिर हॉकी अकादमी, तेलंगणा ० (मध्यंतर ६-०)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.