Lonavla News : लोणावळ्यात लग्नासाठी हाॅटेल देणे पडले महागात, हाॅटेल मालकाला 50 हजाराच दंड तर वधू-वर पक्षाला 14 हजार दंड

एमपीसी न्यूज :  कोविड 19 च्या नियमाचे उल्लंघन करत लोणावळ्यात एका लग्नसोहळ्यासाठी हाॅटेल भाड्याने देणे हाॅटेल मालकाला महागात पडले आहे.

लोणावळा नगरपरिषदेने येथील ग्रॅन्ड विसावा हाॅटेल मालकाला 50 हजार रुपयांचा दंड केला असून कोविड 19 च्या नियमांचे व फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांना लोणावळा शहर पोलिसांनी 14 हजाराचा दंड व हाॅटेल मालकावर भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

चार दिवसापुर्वीच गोल्ड व्हॅली येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या लग्न सोहळ्याला दंड केल्यानंतर विसावा हाॅटेलमध्ये हा दुसरा प्रकार उघड झाला आहे. लग्नसोहळ्यासाठी 25 जणांची उपस्थित ग्राह्य असताना याठिकाणी 76 नागरिक उपस्थित होते. लोणावळा शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू असताना शहराबाहेरील नागरिक शहरात नियमांचे उल्लंघन करत असल्याचे या दोन्ही घटनांवरून समोर आले आहे.

कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासोबत संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्यासाठी लोणावळ्यातील एंट्री पाॅईटला चेकनाके लावण्यात येणार असून याठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी तसेच क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात येणार आहे.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे विनाकारण घराबाहेर पडू नयेत तसेच बाजारात खरेदीसाठी जाताना फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.