Pune Crime News : कोयत्याने सपासप वार करून हॉटेल मालकाचा खून, घटना सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका हॉटेल मालकावर कोयत्याने सपासप वार करीत त्यांचा निर्घृण खून करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेत रामदास आखाडे (वय 38) असे मृत्युमुखी पडलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आखाडे यांचे उरळीकांचन परिसरात प्रसिद्ध हॉटेल आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते हॉटेल बाहेरील खुर्चीवर जाऊन बसले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीपैकी एकाने रामदास आखाडे यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले. तीन ते चार जबर वार केल्यानंतर तो बाहेर उभ्या असणाऱ्या साथीदारासह दुचाकीवरून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रामदास यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.