House Break-in News : सावधान ! शहरात उघड्या दरवाजावाटे चोऱ्यांचे प्रमाण वाढतेय

महिनाभरात तब्बल 10 घटना, साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – तुम्ही घर उघडे ठेऊन जर इकडे-तिकडे जात असाल अथवा घरातच कामात व्यस्त असाल, तर तुम्ही खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण उघड्या दरवाजावाटे चो-यांचे प्रमाण शहरात वाढत आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीत शहरात असे 10 प्रकार घडले असून त्यात चोरट्यांनी 9 लाख 51 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.

या दहा घटनांमध्ये पिंपरी परिसरात चार, निगडी परिसरात तीन, हिंजवडी, चाकण आणि भोसरी परिसरात प्रत्येकी एक घटना घडली आहे.

निगडी येथे गुरुवारी (दि. 14) दोन घटना घडल्या. त्यातील पहिल्या गुन्ह्यात अनिता अरुण लोहकरे (वय 77, रा. आकुर्डी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी लोहकरे गुरुवारी सकाळी अंघोळ करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश केला. बाथरूमची कडी बाहेरून लावून बेडरूममधून तीन लाख 71 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली.

दुस-या घटनेत सुवर्णा प्रकाश पाटील (वय 50, रा. गंगानगर, प्राधिकरण, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या घरात एका अनोळखी महिलेने उघड्या दरवाजावाटे दुपारी सव्वा बारा वाजता प्रवेश केला. त्यानंतर तिने घरातून पर्स, रोख रक्कम, मोबाईल फोन असा एकूण एक लाख 66 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर २१ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेत चोरट्यांनी 38 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.

पिंपरीतील नेहरुनगर येथे असलेल्या कोविड सेंटरमधून 4 जानेवारी रोजी चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज चोरुन नेला. तसेच अन्य तीन घटनांमध्ये दोन लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. हिंजवडी, चाकण आणि भोसरी मधून एक लाख 16 हजारांचा ऐवज चोरट्यांनी उघड्या दरवाजावाटे चारुन नेला आहे.

घराचा दरवाजा उघडा ठेऊन घरातील महिला मंडळी काम करतात. काही भाडेकरुही घर उघडे ठेऊन काम करतात. काही ठिकाणी नागरिक दुपारी दरवाजे उघडे ठेऊन झोपतात. अशावेळी चोरटे गैरफायदा घेऊन घरात येतात आणि घरातील हाताला लागेल ती वस्तू घेऊन जातात.

काही चोरटे घरातील व्यक्तिंचे लक्ष विचलीत करुन कपाट उघडून दागिने देखिल चोरुन नेतात. त्यामुळे नागरीकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.