Chinchwad : पार्किंगला जागा नसताना वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाला जागा कशी देता? स्थायी सदस्यांचा सवाल 

महापालिकेच्या दरानुसार कार्यालय भाड्याने देण्यास मान्यता 

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बस स्थानकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या व्यापारी संकुल येथे पार्किंगसाठी जागा नाही, असे असताना संकुलाचा पहिला मजला वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयासाठी कसा देता? असा सवाल स्थायी समिती सदस्यांनी केला. तसेच पार्किंगची काय सोय केली जाणार, गर्दीचे नियोजन कसे करणार असे विविध प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. महापालिकेच्या दरानुसार कार्यालय भाड्याने देण्यास उपसूचनेसह मान्यता देण्यात आली. 

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार  पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बस स्थानकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने व्यापारी संकुल उभारले आहे. या व्यापारी संकुलात वाहतूक पोलिसांचे मुख्यालयास जागा देण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.

यावर बोलताना राजेंद्र गावडे, शितल शिंदे म्हणाले, चिंचवडगावातील बस स्टॉप येथे जागा कमी आहे. पार्किंगची सोय कमी आहे.  हा परिसर वर्दळीचा आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणि  गर्दीत आणखीन भर पडणार आहे.  वाहतुकीचे नियोजन कसे केले जाणार आहे? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडील शासनाच्या नियमानुसार भाडे आकारुन देण्याऐवजी महापालिकेच्या दरानुसार भाड्याने देण्याची उपसूचना देत पहिला मजला भाड्याने देण्यास मान्यता दिली. पार्किंगची सोय नसल्याने पोलिसांना व्यापारी संकुलाचा पहिला मजला देण्यास काही सदस्यांनी विरोध केला. तर, काही सदस्यांनी कार्यालय बसून राहण्यापेक्षा भाडू सुरु होईल, अशी भावना व्यक्त केली.  प्रशासनाची बाजू जाणून घेतल्यानंतर  पहिला मजला भाड्याने दिले असल्याचे स्थायी समिती सभापती मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.