How to Live with Covid-19?: पाच मुद्द्यांमध्ये जाणून घ्या, कोरोना विषाणूबरोबर कसं जगायचं?

How to Live with Covid-19 ?: Learn in five points, how to live with Corona virus?

एमपीसी न्यूज – सत्तर दिवसांच्या लॉकडाउननंतर, अनलॉक 1.0 कार्यान्वित झाला आहे. अधिकृतपणे घोषित लॉकडाउन 5.0, 1 जून 2020 पासून सुरु असून, अर्थव्यवस्था आणि सामान्य जीवन नियंत्रित आणि टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत परत येत आहे. ही एक नवीन सामान्य जीवनाची  सुरुवात आहे. ती अनेक दिवस चालणार आहे. ‘आपण विषाणूसह जगायला शिकले पाहिजे’, असे तज्ज्ञ आणि अधिकारी सुचवत आहेत.

लस यायला अजून काही महिन्यांचा अवकाश आहे. तोपर्यंत आपल्याला पुन्हा सामान्यपणे जगण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन यांनी ‘विषाणूंसह जगण्यासाठी’ पाच सूचना दिल्या आहेत.

प्रा.विजय राघवन म्हणाले, ‘एकतर आपण विषाणूला बदलायला पाहिजे, किंवा आपण स्वतःला बदलले पाहिजे. विषाणू बदलण्यास वेळ लागणार आहे. औषधे आणि लशींचे संशोधन आणि विकास सुरू आहे, परंतु व्यापक वैद्यकीय चाचण्यांनंतर व्यापक वापरासाठी या लशी उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार आहे. प्रत्येकासाठी औषधे आणि लस तयार करण्याची प्रकिया देखील वेळखाऊ आहे. दरम्यान, महामारीचा सामना करण्यासाठी आपण स्वतःला बदलावे लागेल.’

प्रा.राघवन यांनी केलेल्या पाच सूचना –

1.  जेव्हा आपण घराबाहेर पडता तेव्हा मास्क वापरा

अलिकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती बोलते तेव्हा लाळेचे जवळपास 1000 लहान थेंब बाहेर पडतात. जर त्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर या प्रत्येक थेंबामध्ये हजारो कीटाणू असतील. मोठे थेंब सामान्यत: एक मीटरच्या अंतरात जमिनीवर पडतात. मात्र, प्रामुख्याने जर जागा हवेशीर नसेल तर लहान थेंब जास्त काळ हवेत तरंगू शकतो. कोरोना विषाणूचा संसर्ग असलेल्या ब-याच लोकांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच, त्यांना संसर्ग झाला आहे याची त्यांना जाणीवही असू शकत नाही. आपल्याला संसर्ग झाला असेल तर मास्क परिधान केल्यामुळे केवळ आपलेच नव्हे तर इतरांचेही संरक्षण होते.

2.  जागरूकपणे हात स्वच्छ ठेवण्याची सवय ठेवा

डब्ल्यूएचओच्या नेतृत्त्वाखालील अभ्यासानुसार चीनमधील 75 हजार 465 कोविड -19 रुग्णांच्या विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, कोरोना विषाणू प्रामुख्याने लोकांमध्ये श्वसन थेंब आणि संपर्क या मार्गाने प्रसारित होतो. जेव्हा संक्रमित लोकांशी एखाद्याचा थेट संपर्क येतो, तेव्हा कोविड -19 विषाणूचा प्रसार होऊ शकतो. तसेच जेव्हा आपण त्याच्या आसपासच्या पृष्ठभागावर किंवा संक्रमित व्यक्तीद्वारे वापरलेल्या वस्तू (उदा. दरवाजाचे हँडल आणि वॉशरूम टॅप) यांना स्पर्श करतो, अशा वेळी देखील संसर्ग होऊ शकतो. हातावरील विषाणू चेहेर्‍यापर्यंत पोहोचू न देण्यासाठी कमीतकमी तीस सेकंदापर्यंत आपण साबणाने आपले हात पूर्णपणे धुवून घेतल्यास, आपल्या हातातला विषाणू नष्ट होतो. काही सूचना अशा आहेत की, विषाणू संसर्गजन्य आणि तोंडाद्वारे देखील पसरू शकतो. म्हणून हात पाय धुणे चांगले आहे.

3.  सामाजिक अंतर राखणे

बहुधा, संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा त्याने श्वासोच्छवासाद्वारे बाहेर टाकलेल्या थेंबाचा आपण केलेल्या श्वासोच्छवासातून होतो. सामान्य स्थितीत हे थेंब संक्रमित व्यक्तीपासून सुमारे एक मीटर अंतरावर प्रवास करतात. बाजारपेठ, कार्यालये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये एकमेकांपासून एक मीटर अंतर ठेवल्यास संसर्ग रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. तरुणांना लक्षणे न आढळता संसर्ग होऊ शकतो आणि ते वृद्धांनाही बाधित करतात. प्रामुख्याने वृद्धांसारख्या असुरक्षित आणि अनेक प्रकारे आजारी असलेल्या लोकांपासून विषाणू दूर ठेवण्यासाठी आपण विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

4.  चाचणी आणि पाठपुरावा

जर एखादी व्यक्ती कोविड-19 बाधित असल्याचे दिसून आले तर एखाद्याने त्याचवेळेस परत जावे आणि त्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील लोकांचा शोध घ्यावा. संपर्कातील व्यक्तींची ओळख पटली पाहिजे. त्यांची तपासणी केली पाहिजे. केवळ एक संक्रमित व्यक्ती हा विषाणू इतरांपर्यंत पोहोचवू शकतो किंवा पृष्ठभाग दूषित करुन विषाणूचा प्रसार करू शकतो. जर बहुतेक संक्रमित व्यक्तींची ओळख पटली तर विषाणूच्या संप्रेषणावर नियंत्रण ठेवणे सोपे होते.

5.  अलगीकरण

ज्या लोकांना बाधित रुग्ण म्हणून ओळखले गेले आहे, त्यांना वेगळे केले पाहिजे. अलगीकरण केल्यास संक्रमित व्यक्तीला योग्य वैद्यकीय मदत मिळू शकते. पुढे, वेगळे राहिल्यामुळे संक्रमित व्यक्ती इतरांना हा विषाणू पसरवत नाही. यातून संसर्गाची साखळी तोडली जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.