HSC Exam : बारावीची पुरवणी परीक्षा जुलै मध्ये होणार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (HSC Exam ) घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत अपयश आले आहे, अशा विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर थांबण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळाकडून पुढील दोन महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दाखल होणारे पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले परंतु परीक्षा न दिलेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी, आयटीआय विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 29 मे ते 9 जून या कालावधीत आवेदनपत्रे भरता येणार आहेत. या विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 10 जून ते 14 जून या कालावधीत आवेदनपत्रे भरता येतील.

उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 1 जून ते 15 जून या कालावधीत बँकेत चलनाद्वारे शुल्क भरता येईल. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरण्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या 16 जून पर्यंत जमा कराव्यात, अशा सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिल्या आहेत.

आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरता येतील.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाखांमधून 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एक लाख 23 हजार 903 विद्यार्थी नापास झाले आहेत. एकंदरीत राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी निकालाची टक्केवारी घसरली आहे.

सन 2021 मध्ये राज्याचा निकाल 99.63 टक्के लागला होता. त्यानंतर निकालाची टक्केवारी घसरून सन 2022 मध्ये 94.22 टक्के निकाल लागला. यावर्षी पुन्हा निकालाची टक्केवारी घसरली आहे. सन 2023 या वर्षाचा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी निकालाची टक्केवारी घसरली (HSC Exam ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.