Beirut Blast: बैरुत स्फोटांनी हादरले; 78 जण ठार तर 3700 हून अधिक जखमी

Huge explosion in Lebanon's capital Beirut more than 78 dead and 3700 injured बैरुत पोर्ट येथील एका वेअर हाऊसमध्ये झालेल्या या स्फोटातील जखमींमुळे शहरातील सर्वच रुग्णालये पूर्णपणे भरले आहेत.

एमपीसी न्यूज- लेबनानची राजधानी बैरुतमध्ये मंगळवारी झालेल्या भीषण स्फोटांमुळे आतापर्यंत किमान 78 लोकांचा मृत्यू तर 3700 हून अधिक जण जखमी झाले आहेत. लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाने या स्फोटात किमान 78 जण मारले गेल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

आरोग्य मंत्री हमद हसन यांनी मृतांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. याचदरम्यान पंतप्रधानांनी आपात्कालीन बैठकीचे आयोजन केले आहे. कदाचित दोन आठवड्यासाठी देशात आणीबाणी लागू केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्य मंत्री हसन म्हणाले की, बैरुत पोर्ट येथील एका वेअर हाऊसमध्ये झालेल्या या स्फोटातील जखमींमुळे शहरातील सर्वच रुग्णालये पूर्णपणे भरले आहेत. या स्फोटात कतीब पक्षाचे सरचिटणीस निजार नजरियान यांचाही समावश आहे. निजार यांच्या पक्षाचे मुख्यालय बैरुत बंदराच्या ठीक समोर होते.

‘द नॅशनल कौन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च’ने म्हटले की, हा भीषण स्फोट अमोनियम नायट्रेटमुळे झाला आहे. हे वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते.

मागील 6 वर्षांपासून या वेअर हाऊसमध्ये 2750 टन अमोनियम नायट्रेट ठेवण्यात आले होते, असे सांगण्यात येते. खत तयार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. लेबनानचे राष्ट्राध्यक्ष मायकल आऊन यांनी टि्वटरवर म्हटले की, सुरक्षेची काळजी न घेता 2750 टन अमोनियम नायट्रेट ठेवणाऱ्यांविरोधा कठोर कारवाई केली जाईल.

हे स्फोट इतके भीषण होते की आजूबाजूच्या इमारती हादरल्या. यामुळे इमारतींमधील नागरिक भूकंप झाल्याच्या भीतीने बाहेर पडले. प्रत्येक जण आपल्या नातेवाईकांच्या तब्येतीची विचारपूस करत होते.

या स्फोटांचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. बैरुतमधील दुहेरी स्फोटांचा व्हिडिओ एका इमारतीच्या गॅलरीतून शूट करण्यात आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्फोटानंतर हवेत आगीचे लोळ उठले आणि त्यानंतर धुळ उडाली. हा व्हिडिओ शूट करणारेही स्फोटाच्या हादऱ्याने इमारतीच्या गॅलरीत पडले.

भारतीय दुतावासाने जारी केला हेल्पलाइन क्रमांक

बैरुतमधील स्फोटानंतर लेबनानमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. दुतावासाने भारतीय नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. कुठल्याही भारतीय नागरिकांना मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन दुतावासाकडून करण्यात आलं आहे.

दुतावासातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. दुतावास सर्व भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. स्फोटांमध्ये अद्याप कुठल्या भारतीय नागरिकाची हानी झाल्याचे वृत्त नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.