Pune : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात विशाल निरंकारी संत समागम

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनच्या प्रमुख, सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात मंगळवारी (दि.२८)  सायंकाळी ५.०० ते रात्री ८.३० या वेळात महालक्ष्मी लॉन्स, खांदवे नगर, जकात नाका समोर, नगर रोड, वाघोली, पुणे-४७ येथे विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज सध्या महाराष्ट्राच्या कल्याण यात्रेवर असून नुकताच दिनांक २४, २५ व २६ जानेवारी, २०२० रोजी त्यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा ५३ वा वार्षिक निरंकारी संत समागम नाशिक येथे मोठ्या हर्षोल्हासाच्या वातावरणात संपन्न झाला. या संत समागमानंतर लगेचच सद्गुरु माताजींनी पुणे शहरामध्ये संत समागमासाठी वेळ दिल्याने संपूर्ण जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील निरंकारी भक्तगण तसेच प्रभूप्रेमी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या संत समागमामध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण सहभागी होणार आहेत. अध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून जगामध्ये मानवता, विश्वबंधूत्व आणि शांतीसुखाचे वातावरण स्थापित करणारा मिशनचा सत्य, प्रेम व एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोचविणे हा या संत समागमाचा उद्देश आहे.

संत समागमामध्ये मिशनमधील विद्वान वक्ते आपले अनुभवसंपन्न विचार, भक्तीरचना आणि कवितांच्या माध्यमातून आपले भाव व्यक्त करतील. पुणेकरांसाठी ही एक अध्यात्मिक पर्वणी असून प्रभूप्रेमी भाविकांनी या संत समागमाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.