Chakan : प्रचंड पोलीस बंदोबस्तात भामा आसखेड प्रकल्पातील जलवाहिनीचे शनिवारीही काम सुरु

स्थानबद्ध धरणग्रस्तांची न्यायालातून सुटका;धरण परिसरात जमाव बंदी लागू 

एमपीसी न्यूज –  भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडलेले जॅकवेल आणि जलवाहिनीचे काम सुरू करण्यासाठी गुरुवारी (दि.१६) मध्यरात्रीपासून आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची धरपकड करून प्रचंड पोलीस बळाचा वापर करीत शुक्रवार (दि.१७) पासून कामास सुरुवात करण्यात आली असून शनिवारी (दि.१८) दुसऱ्या दिवशीही काम सुरु ठेवण्यात आले आहे.  स्थानबद्ध केलेल्या दहा जणांची न्यायालयातून सुटका झाली आहे. तेरा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  धरण परिसरात जमाव बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.        

पुणे शहराच्या पूर्व भागाला खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या धरणापासून १७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली असून सर्व काम पूर्ण झाले असून केवळ जॅकवेल आणि काही अंतरावरील जलवाहिनीचे काम शिल्लक आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात मोबादला न मिळाल्याने हे काम गेल्या वर्षांपासून सातत्याने धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून बंद पाडले जात आहे. हे काम पुन्हा सुरू करावे, यासाठी पुणे महापालिकेने पोलिसांची मदत घेतली आहे.

याबाबत चाकण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची मागील आठवड्यात बैठक घेतली होती. मात्र, प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यानंतर धरणग्रस्तांनी एक बैठक घेऊन सामुहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे भामाआसखेड जलवाहिनीचे उर्वरित काम करताना अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्रचंड पोलीस बंदोबस्त :  

धरणावर काम सुरु करण्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून या बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आली होती. २ सहाय्यक पोलीस आयुक्त, ८ पोलीस निरीक्षक, १८ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी (८० जवान) घटनास्थळी तैनात करण्यात आलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like