Pimpri: ‘इंद्रायणी थडी’ जत्रेला बचतगटांचा प्रतिसाद, स्टॉलसाठी दोन हजार अर्ज

जत्रेसाठी तब्बल २ हजार अर्जांमधून 800 स्टॉल्सची निश्चिती

एमपीसी न्यूज – ‘इंद्रायणी थडी’ जत्रेची स्टॉल वाटप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या जत्रेच्या माध्यमातून महिला बचतगचटांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.  स्टॉलची मागणी करण्यासाठी तब्बल 2 हजार 78 अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी करून 800 स्टॉल निश्चित करण्यात आले आहेत.

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरविण्यात येणार आहे. 30 ते 2 फेब्रुवारी 2020 दरम्यान असे चार दिवस, सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगाटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावर्षी दुसरे पर्व साजरे करीत आहे. जत्रेतील एकूण स्टॉल्सपैकी 80 टक्के स्टॉल महिला बचतगटांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये बचतगटांनी निर्माण केलेली उत्पादने नागरिकांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत.

तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ यासह जनजागृती करणाऱ्या संस्था-संघटनांचे स्टॉल आहेत. खाद्यपदार्थ, प्रदर्शन, आरोग्य आणि प्रथमोपचार, ज्वेलरी, कपडे, फूटवेअर, नाविन्यपूर्ण वस्तू, घरगुती सौदर्य प्रसाधने आदी विविध स्टॉल या जत्रेत पहायला मिळणार आहेत.

गतवर्षी पेक्षा यावर्षी इंद्रायणी थडी जत्रेला महिला बचतगट आणि अन्य विविध संस्था-संघटनांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. 12 एकर मैदानावर हा महोत्सव होणार आहे. जत्रेतील स्टॉलसाठी 2 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. पण, त्यापैकी केवळ 800 स्टॉल्सला आम्हाला परवानगी देता आली, असे शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा लांडगे यांनी सांगितले.

असे असतील जत्रेतील स्टॉल
-विविध खाद्यपदार्थ 400 स्टॉल
– विविध प्रदर्शन 80 स्टॉल
– वैद्यकीय माहिती/ प्रथोमोपचार 10 स्टॉल
– ज्वेलरी/ कपडे/ फूट वेअर व इतर 300 स्टॉल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.