Pimpri : ज्ञान प्रबोधिनीत ”अनबॉक्स टिंकरिंग वर्कशॉप”ला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – देशातील नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित ”अनबॉक्स टिंकरिंग वर्कशॉप”ला शिक्षक, विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शकांद्वारे आर्डिनो, रासबेरी-पाय, सुरचना-विचार (डिझाईन-थिंकिंग), विविध इलेक्ट्रॉनिक संवेदके (सेन्सर्स) व त्यांचे उपयोजन, प्रतिकृती बनवणे, सादरीकरण कौशल्ये यांचे प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले.

निगडी, प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय येथे  9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान चार दिवसीय “अनबॉक्स टिंकरिंग वर्कशॉप” या शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील नवनिर्मितीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नीती आयोग अंतर्गत अटल इंनोवेशन मिशन आणि आयबीएम व विक्रम साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर (अहमदाबाद) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अटल टिंकरिंग लॅब प्राप्त शाळेतील सुमारे 40 शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शकांद्वारे आर्डिनो, रासबेरी-पाय, सुरचना-विचार (डिझाईन-थिंकिंग), विविध इलेक्ट्रॉनिक संवेदके (सेन्सर्स) व त्यांचे उपयोजन, प्रतिकृती बनवणे, सादरीकरण कौशल्ये यांचे प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेला अटल इनोव्हेशन मिशनच्या विष्णु प्रिया यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांसोबत संवाद साधला. तसेच, विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबला भेट दिली व चालू कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

या प्रशिक्षण कार्यशाळेतील अनुभवांचा वापर करून सहभागी अध्यापकांना, त्यांच्या शाळेतील नव-प्रवर्तक विद्यार्थ्यांना, कल्पना-तंत्रांचा वापर, नीतीमत्ता व नेतृत्त्व- विकसनासंदर्भात मार्गदर्शन करता येईल. अशाप्रकारे, ही कौशल्ये एका घटकापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाला त्याचा लाभ होणार आहे.

ज्ञान प्रबोधनीचे उपकेंद्र प्रमुख मनोजराव देवळेकर यांनी सांगता समारोहात मार्गदर्शन  केले आणि त्यांच्या हस्ते उपस्थित शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.