Pimpri : बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात सामाजिक संघटनांची मानवी साखळी (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – शहरात होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीविरोधात पिंपरी-चिंचवड शहरातील 30 सामाजिक, निसर्गप्रेमी संघटनांनी मानवी साखळी केली. निगडीमधील पवळे उड्डाणपुलाखाली झालेल्या या मानवी साखळीमध्ये शहरातील नागरिक, संस्था व संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बेकायदेशीर वृक्षतोड विरोधी मानवी साखळीमध्ये पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, ग्राहक पंचायत पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड शहर विकास मंच, अंघोळीची गोळी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, शेखर आण्णा युथ फाउंडेशन, स्वामी विवेकानंद जीवन शिक्षण विद्या मंदिर, टाटा मोटर्स एम्प्लॉयी, अभंग शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था, भावसार व्हिजन पिंपरी-चिंचवड, जलदिंडी प्रतिष्ठान, पवना जलमित्र, दीक्षा एनजीओ, देवराई फाउंडेशन, कै. कैलास तनपुरे फाउंडेशन, दिशा नेत्रालय, संतमित्र फाउंडेशन, देश का सच्चा हिरो चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक महासंघ, निसर्ग मित्र – सावरकर मंडळ, सावरकर मित्र मंडळ, निसर्गराजा मित्र जीवांचे, पर्यावरण संवर्धन समिती, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रॉबिन हूड आर्मी, थेरगाव सोशल फाउंडेशन, नाम फाउंडेशन पिंपरी-चिंचवड, संवाद युवा प्रतिष्ठान बिजलीनगर, सहगामी आदी संघटनांनी सहभाग घेतला.

सर्व संघटनांच्या सदस्यांनी बेकायदेशीर वृक्षतोड जनजागृतीचे फलक घेऊन मानवी साखळी केली. झाडे लावा झाडे जगवा, बेकायदेशीर वृक्ष तोडल्यास एक वर्ष कारावास, बेकायदेशीर वृक्षतोड थांबवा, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा यांसारख्या पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. राज्यभर कोट्यवधी वृक्षांची लागवड करण्यात येणार. वृक्षांच्या संगोपनासाठी विविध उपक्रम, योजना आणि नियम बनवून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतू प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. त्याउलट आहे त्या वृक्षांचाही विनाकारण बळी घेतला जात आहे.

पर्यावरणप्रेमी संघटना प्रशासनाकडे वृक्षसंवर्धनाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. शहरातील यमुनानगर, डांगे चौक आणि अन्य भागात भर दिवसा वृक्षतोड केली जात आहे. निसर्ग मानवाला ख-या अर्थाने जीवन देत आहे. झाडांपासून मानवाला प्राणवायू मिळतो. त्याचबरोबर फळे, फुले, औषधे आणि अन्य कित्येक उपयोगी वस्तू मिळतात. त्यासाठी या वसुंधरेला हिरवाईचा शालू नेसविण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्नशील राहायला हवे. बेकायदेशीर वृक्षतोड करणा-यांना कठोर शासन व्हायला हवे. याबाबत या मानवी साखळीमध्ये संदेश देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.