Pune : कोरोना संक्रमित आईच्या बाळाला दूध पाजण्यासाठी ससून हॉस्पिटलमधील ‘मिल्क बँके’ची सुरुवात

एमपीसी न्यूज- ससूनमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत. जुना खडकी बाजार येथील एका 25 वर्षीय महिला 16 एप्रिल रोजी ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली. ती कोरोना बाधित होती. तिने शनिवारी एका बाळाला जन्म दिला. परंतु सुदैवाने बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. संक्रमणाचा धोका असल्याने बाळाला आईजवळ न ठेवता नवजात शिशु कक्षात वेगळे ठेवण्यात आले. परंतु बाळाला आईच्या दुधापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे  ससूनमध्ये मिल्क बँकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मिल्क बँक म्हणजे ज्या महिलेला दूध अधिक असते, ते अधिकचे दूध मिल्क बँकेत साठविण्यात येते आणि ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही, त्यांना या मिल्क बॅंकेतून दूध दिले जाते. ह्या कोरोनाबाधित आईचे बाळ ठणठणीत आहे. तसेच जी मुले कोरोनाबाधित आहेत, त्यांच्यावरही ससून मध्ये उपचार सुरु आहे. दीड-दोन वर्षांचे पाच लहान मुले आहेत. त्यांना आई जवळ जाता येत नाही.अशा मुलांसाठी स्वतंत्र कक्षात व्यवस्था करण्यात आली आहे. ही मुले बाधित असली तरी त्यांच्यातील लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत.

दूध बँकेत ज्या मातांच्या शरीरात दुधाचे प्रमाण जास्त आहे, त्या मातांची दूध संकलनाच्या दृष्टीने सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी केली जाते. दुधावाटे लहान बाळांना रोगांची लागण होऊ नये ,याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून दान करण्यात आलेल्या दुधाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते.आणि बाळाच्या आई वडिलांच्या परवानगीनंतरच बाळाला दूध पाजण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.