Pune : खाकीतील माणुसकीचे दर्शन! उदरनिर्वाहाचे साधन असलेली सायकल चोरीला जाते तेव्हा…

एमपीसी न्यूज – एरव्ही समाजात पोलीस आपला मित्र आहे यापेक्षा पोलिसांची भीतीच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. शहाण्या माणसाने पोलीस ठाण्याची पायरी चढून नये वगैरे… असा समज जनसामान्यात पाहायला मिळतो. मात्र, अनेकवेळा खाकीतील काही अधिकारी या प्रतिमेला तडे देत माणुसकीचे दर्शन घडवतात. खाकीतील माणुसकीचा असाच एक अनुभव वानवडी येथील ज्येष्ठ नागरिक काळुराम शेरे यांना आला, जेव्हा त्यांची उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असलेली सायकल चोरीला गेली.

काळुराम शेरे हे वानवडीतील शिंदे छत्री येथे राहतात. ते दररोज सायकलवर पुण्यातील कोंढवा, वानवडी, कॅम्प औंध या भागात खाजगी जेवणाचे डबे कार्यालयापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. त्यामुळे सायकल ही त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होती. मात्र, शनिवारी (दि.11) त्यांची सायकल कॅम्प भागातून चोरीला गेली.

काळुराम यांनी तात्काळ याची तक्रार लष्कर पोलीस ठाणे अंतर्गत येणा-या अंकीत चारबावडी पोलीस चौकी येथे दिली. चौकीचे अधिकारी यांनी शेरे यांच्यासाठीचे सायकलीचे महत्व समजून पोलीस उपनिरीक्षक कुलाळ आणि पोलीस नाईक मुलाणी यांनी या सायकलचा कॅम्प परिसरात शोध घेतला. मात्र, सायकल मिळाली नाही. त्यामुळे शेरे हे निराश झाले होते.

त्यामुळे पोलीस उप निरीक्षक काळे आणि पोलीस नाईक मुलाणी यांनी व सामाजिक कार्यकर्ते विकास भांबुरे यांनी मिळून स्वखर्चाने शेरे यांना नवीन सायकल खरेदी करून दिली आणि त्यांचे नैराश्य दूर केले.

पोलिसांच्या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतुक

पोलीस उपनिरीक्षक कुलाळ आणि पोलीस नाईक मुलाणी यांच्या या कामगिरीचे पुणे पोलिसांच्या ट्विटर हँडलसह संपूर्ण सोशल मीडियावर कौतुक होत आहे. गुड जॉब, ग्रेट वर्क, अशा शब्दांत अनेकांनी खाकीतील या माणुसकीचे कौतुक केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.